Jamner Nagar Parishad Election: जामनेर नगरपरिषद निवडणुकीत (Jamner Nagar Parishad Election) पक्षातील उमेदवारांना प्रलोभने देऊन आणि दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Faction) केला होता. जामनेरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा मुस्लिम नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना झाले होते. या उमेदवारांचा अज्ञात स्थळी जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. आता अर्ज माघारीची मुदत संपल्यावर हे सहा उमेदवार जामनेर येथे पुन्हा परतले आहेत. 

Continues below advertisement

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जावेद मुल्ला म्हणाले की, जामनेर नगरपालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना प्रलोभने देऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता. अर्ज माघारीच्या दिवशी आपण पाच उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेले होते. आपल्यावर कोण दबाव आणत आहे? हे सगळ्या जनतेला माहित आहे. मात्र त्यांचे नाव आपण आज सांगू शकत नाही. निवडणूक प्रक्रिया आटोपल्यावर ते आपण जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Jamner Nagar Parishad Election: भाजपच्या अनेक उमेदवारांचे फोन

जामनेर नगरपरिषद निवडणुकीत एक हाती विजय मिळविण्यासाठी भाजपाकडून हे केले जात आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. तुम्ही मागच्या पाच वर्षात विकासकामे केली आहेत तर मग आता इतर पक्षाचे उमेदवार मागे घेण्यासाठी का प्रयत्न करावे लागत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. तर साधना महाजन यांचे नाव न घेता त्यांचा विजय नसून ती लोकशाहीची हत्या असल्याचे सांगत जावेद मुल्ला यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बहुमताने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, आपण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अज्ञातस्थळी असताना भाजपच्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आपल्याला अनेक फोन आले होते. वेळ आली तर आपण त्यांची नावेही जाहीर करू, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

Jamner Nagar Parishad Election: जामनेरमध्ये 17 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात 

जामनेर नगरपरिषद निवडणूकीत माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून अध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन या बिनविरोध विजयी झाल्या असून नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 59 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रभाग एक मधून भाजपाचे दत्तात्रय जोहरे यांना तीन विरोधी उमेदवारांशी लढत करावी लागणार आहे. तर प्रभाग तीनमधून भाजपाचे बाबुराव हिवराळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे यांच्यात सामना रंगणार आहे. प्रभाग 9 मधून विद्यमान नगरसेवक आतिष झाल्टे यांचा सामना त्यांचे सख्खे चुलत भाऊ राष्ट्रवादीचे संतोष झाल्टे यांच्याशी होणार आहे. दरम्यान, भाजपाचे 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. 

आणखी वाचा 

Rohit Pawar on Girish Mahajan: बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? गिरीश महाजनांसारख्या बेफाम मंत्र्यांचा फडणवीसांनी तत्काळ राजीनामा घ्यावा; जामनेर निवडणुकीवरून रोहित पवार संतापले