Jalgaon zilla Dudh Sangh Election : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या (Jalgaon zilla Dudh Sangh Election) निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दूध संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सध्या भाजप-शिंदे गट आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा गट पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) हे आघाडीवर आहेत. या निवडणुकीत नेमकं काय होणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मंगेश चव्हाण हे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी मतदार केंद्रातून काढता पाय घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 


मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील आघाडीवर


जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनल विरुद्ध शिंदे गट आणि भाजपच्या शेतकरी पॅनलमध्ये लढत होती. यात प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये भाजप आणि शिंदे गट आघाडीवर आहे. मुक्ताईनगर येथील मतदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या विरोधातील शेतकरी पॅनलचे उमेदवार भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे धरणगाव मतदारसंघातून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन, तर पारोळा मतदार संघातून आमदार चिमणराव पाटील हे आघाडीवर आहे..


20 जागांसाठी जिल्हा दूध संघाचे एकूण 39 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पाचोरा मतदारसंघातून दिलीप वाघ हे अगोदरच बिनविरोध विजय झाले होते. 19 जागांसाठी निवडणूक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 19 पैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे आणि भाजप गटाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon News : खडसे की महाजन? कोण उधळणार विजयाचा गुलाल, आज जळगाव जिल्हा दूध संघाचा निकाल