जळगाव : शहरातील स्वामी समर्थ केंद्रात दान पेटीतील निधीसह अध्यक्षांच्या वैधतेविषयी सेवेकऱ्यांच्या दोन गटात वाद उभा राहिला आहे. मंदिराच्या दानपेटीमध्ये भ्रष्टाचार केला जात असून त्याचा निधी हा इतर कामांसाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप एका गटाने केला आहे. तर हे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा दुसऱ्या गटाकडून करण्यात आला. या दोन्ही गटाच्या वतीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याने भक्तांमध्ये मात्र चर्चेचा विषय बनला आहे.


जळगाव शहरातील प्रताप नगर या ठिकाणी असलेले स्वामी समर्थ केंद्र हे स्वायत्त अध्यात्मिक संस्था आहे. या संस्थेच्या असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात ठेवण्यात आलेल्या दान पेटी मधील निधी हा स्थानिक पातळीवर खर्च केला जाणे अपेक्षित आहे. मात्र या संस्थेच्या विश्वस्तांमार्फत नियमबाह्य पद्धतीने आणि संगनमताने, कोणत्याही प्रकारचा हिशेब न देता हा निधी गुरूपीठाकडे नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच लाखो रुपयांचा गैरव्यवहार अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी केल्याचा दावा, काही स्वामी समर्थ केंद्राच्या जुन्या सेवेकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.


या संदर्भात त्यांनी दानपेटीतून पैसे काढण्यात येत असलेली क्लीप देखील माध्यमाच्याकडे दिली आहे. त्याचबरोबर सध्या जळगाव शहरातील स्वामी समर्थ केंद्रात असलेले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे स्वयंघोषित असल्याचा आरोप देखील केला असून हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत केला आहे.


अध्यक्षांकडून आरोपाचे खंडण


काही सेवेकऱ्यांनी केलेल्या या आरोपाच्या बाबत स्वामी समर्थ केंद्राचे विद्यमान अध्यक्ष बी एन पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत दुसऱ्या गटाच्या सेवकऱ्यांनी गैरव्यवहार बाबत केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. जळगाव येथील स्वामी  समर्थ केंद्र हे देखील दिंडोरी प्रणित आहे, त्यामुळे या ठिकाणी भक्तांच्या माध्यमातून दान पेटीमध्ये येणारी रक्कम ही प्रमुख विश्वस्त यांच्या समोर पंचनामा करून काढण्यात येते.


ती संस्थेच्या बँक खात्यात जमा केली जात असते. यातील काही रक्कम स्थानिक पातळीवर केंद्राच्या विविध खर्चकामासाठी खर्च केली जाते. तर उर्वरित रक्कम ही गुरूपीठाकडे चेक द्वारे पाठवण्यात येत असते. त्याचे दरवर्षी ऑडिट देखील केले जात असल्याचा दावा अध्यक्ष बी एन पाटील यांनी केला. विरोधी गटाकडून करण्यात येत असलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.


दुसऱ्या गटात आरोप करणारे सेवेकरी हे या ठिकाणचे असले तरी ते विविध कारणाने दुखावले गेले असल्याने ते अशा प्रकारचे आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. स्वामी समर्थ केंद्रात सध्या असलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या वैधतेविषयी विरोधी गटाच्या सेवेकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितले आहे. त्याचा निर्णय येणे बाकी असला तरी तो निर्णयही आमच्या बाजूने लागेल असा विश्वास विद्यमान अध्यक्ष बी एन पाटील यांनी व्यक्त केला आहे.


ही बातमी वाचा: