जळगाव : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) अमळनेर येथील प्रसिद्ध श्रीमंगळग्रह मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त शाही तुळशी महाविवाह सोहळा पार पडला. एखाद्या  विवाह सोहळ्याप्रमाणे मिरवणूक, वाजंत्री, वऱ्हाडी आणि जेवणाची पंगत या प्रमाणे  अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात नयनरम्य असा हा सोहळा पार पडला. 


भगवान श्रीकृष्णांना वराचे तर माता तुळशीला साक्षात वधू राणीचे स्वरूप देण्यात आले होते. फुला माळांनी सजलेल्या मंडपात हा विवाह महासोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे ज्यांचे विवाह होत नाही असे युवक-युवती या विवाह सोहळ्यात उपस्थित होते. श्रीमंगळग्रह मंदिरात  विवाहसोहळ्यास उपस्थित राहिल्यास अविवाहितांचा विवाहाचा योग लवकर येतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने मंगळग्रह मंदिरात या विवाह महासोहळ्यासाठी  हजारोंच्या संख्येने देशभरातील भाविकांची गर्दी झाल्याचं पहायला मिळाली. विवाहसोहळ्यानंतर खास खान्देशी मेनू  जेवणासाठी होता. पाच ते दहा हजार वऱ्हाडी या  विवाह सोहळ्यास उपस्थित होते


गेल्या दहा ते बारा वर्षांपासून देशभरात प्रसिद्ध असलेल्या या मंगळ ग्रह मंदिरात हा शाही विवाह सोहळा पार पडतो. या पद्धतीने शाही विवाह सोहळा साजरा करणारे  मंगळ ग्रह मंदिर हे देशातील एकमेव आहे. त्यामुळेच या सोहळ्याला  देशभरातील नवे तर बाहेर देशातील भाविक सुद्धा उपस्थित राहतात. तर काही ऑनलाईन पद्धतीने या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन घेतात.


नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात तुळशी विवाह सोहळा संपन्न


नंदुरबार  जिल्ह्यात मोठ्या उत्साहात तुळशी विवाह सोहळा  पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.  कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावले जातात. वरुण राजाला निरोप देऊन शिशिराचे आगमन होते. त्यानंतर लग्नाच्या मुहूर्तालाही प्रारंभ होतो. तुळशीला वधूच्या रूपात तर शाळिग्राम भगवान वर रुपी सजवून या तुळशी विवाह सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने लग्न सोहळ्याप्रमाणे मांडणी करून अंतरपाट घालून लग्न लावण्यात आले.  विधीवत पूजा करून मंगलाष्टके म्हणून तुळशी विवाह सोहळा लावण्यात आला.


बदलापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 800 दिव्यांची आरास


दिवाळीनंतर येणारी पहिली पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला जातो. बदलापूर शहरात शिवसेनेकडून आज दीपोत्सव साजरा करण्यात आला. बदलापूरच्या मोहनानंद नगर परिसरात शिवसेनेचे अॅड. तुषार साटपे यांनी हा दीपोत्सव साजरा केला. यावेळी तब्बल 800 दिवे प्रज्वलित करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. या दीपोत्सवासाठी परिसरातील महिलांनी मोठा सहभाग घेतला होता. या दीपोत्सवाचं हे तिसरं वर्ष असून पहिल्या वर्षी 600, दुसऱ्या वर्षी 700, तर या वर्षी 800 दिव्यांची आरास या ठिकाणी करण्यात आली होती.