Smita Wagh जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात (Maharashtra News) सायंकाळी सरासरी 59.64 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात धीम्या गतीने सुरुवात झालेल्या मतदानाला दुपारनंतर थोडी गती प्राप्त झाल्याचे दिसून आले. चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. 11 मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान नंदुरबारमध्ये झाले. 


नंदुरबारमध्ये 67.12 टक्के, जळगावला 53.65 टक्के, रावेरमध्ये 61.36 टक्के, जालनामध्ये 68.30 टक्के, औरंगाबादला 60.73 टक्के, मावळला 52.90 टक्के, पुणे येथे 51.25 टक्के, शिरूरला 51.46 टक्के, अहमदनगरमध्ये  62.76 टक्के, शिर्डी येथे  61.13 टक्के आणि  बीडला 69.74 टक्के मतदान झाले. 


महायुतीच्या दोन्ही जागा जिंकून येतील


जळगाव आणि रावेरमध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर स्मिता वाघ (Smita Wagh) म्हणाल्या की, मला शंभर टक्के विश्वास आहे की, आमच्या भाजपाच्या महायुतीच्या दोन्ही जागा जिंकून येतील. दोन्ही मतदारसंघात महिला उमेदवार असून महिलांचा मोठा कल हा मतदानासाठी दिसून आला. तसेच आमच्या बंधूंचीही आम्हाला मतदानासाठी साथ लाभली. गेल्या वेळच्या तुलनेत सव्वा ते दीड टक्का मतदानात वाढ झाली आहे.  नक्कीच 100 टक्के ही जागा महायुतीच जिंकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


रामदेव वाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी


जळगाव जिल्ह्यातील रामदेव वाडीतील अंगणवाडी सेविकेचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे येथील  मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. याबाबत स्मिता वाघ म्हणाल्या की, रामदेव वाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या मनात संताप आहे. मात्र त्या परिवारातील जीव गेल्यामुळे त्या गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. एक दोन गाव सोडून फारसा बहिष्कार कुठे दिसला नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या. 


एकनाथ खडसे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपमध्ये (BJP) घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. याबाबत स्मिता वाघ म्हणाल्या की, एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबतचा निर्णय हा केंद्रीय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. एकनाथ खडसे भाजपमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या


Lok Sabha Election : मतदानावरील बहिष्काराचा सिलसिला सुरुच! बीडच्या केजमध्ये दहा वर्षांत दुसऱ्यांदा मतदानावर बहिष्कार,नेमकं कारण काय?


Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!