जळगाव : गेल्या काही दिवसांपासून देशातील महत्वाच्या शहरांत प्रदूषण वाढत असून दिल्लीत (Delhi) भीषण परिस्थिती उद्भवली आहे. अशातच इतर अनेक शहरात देखील हवेचे प्रदूषण (Air Pollution) गेल्या काही दिवसांत वाढल्याचे चित्र आहे. जळगाव (Jalgaon) शहरात देखील काही दिवसांपासून धुळीचे साम्राज्य पसरले असून यामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचे आजार जडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेळी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


एकीकडे देशातील दिल्ली, मुंबई (Mumbai), पुण्यासारख्या शहरात हवेची गुणवत्ता (Air Quality) ढासळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील प्रदूषण वाढल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत रस्त्यावरील खड्डे, पावसाची पाणी वाहून गेल्यानंतर रस्त्यावर आलेली माती, यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील दवाखाने फुल्ल होत असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडल्याचे निदर्शनास येत आहे. रस्त्यावर काही काळ थांबल्यास संपूर्ण धूळ अंगावर थराप्रमाणे साचत असून याच दरम्यान श्वसनातून शरीरात धूळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांचे आजारी होण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र आहे. 


तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) मोठ्या प्रमाणत जल प्रदूषण देखील होत असल्याच निदर्शनास आले आहे. यामध्ये प्रामुख्याने एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपन्यामधून निघणारे रसायनयुक्त पाणी थेट गटार आणि नाल्याच्या माध्यमातून मोठ्या नद्यांना आणि तलावात जाऊन मिळत आहे. याचा परिणाम नद्या आणि तलावातील जैवविविधतेवर होत आहे. त्यामुळे नदीसह तलाव परिसरातील जैव विविधता नष्ट होत असल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. याचबरोबर नदी तलाव परिसरात असंख्य पशुपक्षी अधिवास करत असतात. या पशुपक्ष्यांच्या अधिवासावर देखील त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 


यासह ग्रामीण भागात अजून एका नव्या प्रदूषणाचा प्रकार वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तो म्हणजे शेतीमध्ये, वाढता रसायन खताचा आणि फवारणीचा वाढलेला वापर, यामुळे जमिनीमध्ये असलेला सेंदिय कर्ब कमी झाल्याने पिकासाठी आवश्यक असलेले जीवाणू नामशेष होऊ लागले आहेत.  जमिनी नापिक होऊ लागल्या आहेत. तर केवळ रसायनयुक्त खते आणि फवारण्या केल्या जात असल्याने त्याचा रेसेड्यू हा भाजीपाला आणि अन्न-धान्यामध्ये वाढत असल्याने कॅन्सरसह विविध आजार वाढत आहेत. तिसरा प्रकार ध्वनी प्रदुषण देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहनांची वाढती संख्या, त्यांना बसविण्यात आलेल्या कर्णकर्कश भोंगे, अवजड वाहनांचे हॉर्न यामुळे ध्वनी प्रदुषण वाढत आहे. तसेच शहरातील विविध समारंभमिरवणुका यामध्ये डीजेचा वापर वाढत असून गरजेपेक्षा जास्तीचा ध्वनीक्षेपकाचा आवाज देखील ध्वनीप्रदूषणाची कारणे आहेत. 



प्रदूषण वाढण्याची कारणे काय? 



घराघरात वाढत असलेली वाहनसंख्या आणि त्यातून उत्सर्जित होत असलेला कार्बन आणि ध्वनी प्रदूषण. तसेच जळगाव जिल्ह्यातील उष्ण आणि कोरडे हवामान यामुळे ही धुळीचे प्रमाण वाढते राहते. तसेच जागोजागी उंच इमारतीची वाढती बांधकामे. भुसावळ तालुक्यातील असलेला औष्णिक वीज प्रकल्प ज्यातून नेहमी राख उत्सर्जित होत असते. झाडांची आणि जंगलांची सातत्याने होत असलेली तोड. कच्च्या मातीचे रस्ते आणि काहीना काही कारणाने त्यात नेहमीच होत असलेले खोदकाम, यामुळे शहरात अनेक भागात धूळ निर्मिती होत असते. नदी पात्राजवळ अनेक गावात असलेल्या वीटभट्ट्या, त्यात इंधनासाठी होत असलेला लाकडाचा आणि दगडी कोळशाचा वापर होतो, त्याच्या परिणामी हवा प्रदूषण होते. 



इतर महत्वाची बातमी : 


पुणेकरांनो काळजी घ्या! मुंबईपेक्षा पुण्याच्या हवेची गुणवत्ता खालावली; गुणवत्तेचा निर्देशांक 161 पार