Jalgaon Family died due to Shock: जळगावच्या एरंडोल तालुक्यात बुधवारी पहाटे शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली होती. एरंडोल तालुक्यातील वारखेडी (Jalgaon News) गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा (Electric Fence in Farm) प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (वय 35), त्यांची पत्नी सुमन पावरा (वय 30), मुलगा पवन (वय 4), मुलगा कवल (वय 3), विकास यांची सासू यांचा समावेश आहे. मात्र, या भयानक दुर्घटनेतून दोन वर्षांचा चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावल्याची माहिती समोर आली आहे.
या लहान मुलीचे नाव दुर्गा पावरा असे आहे. तिचे संपूर्ण कुटुंब कुंपणाला स्पर्श केल्यानंतर शॉक लागून मृत्युमुखी पडले होते. मात्र, दोन वर्षांची ही चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. पोलीस (Jalgaon police) याठिकाणी आले तेव्हा घटनास्थळी कुटुंबीयांच्या मृतदेहाजवळ दुर्गा एकटी बसली होती. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पोलीस कर्मचारी मधुरा पवार यांनी दुर्गाला जवळ घेत तिला मायेची उब देण्याचा प्रयत्न केला होता. दुर्गाला आता तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
Jalgaon News: रानडुक्करांपासून मका वाचवण्यासाठी शेतात करंट सोडला अन् पाच जणांचा मृत्यू
वारखेडी गावातील बंडू पाटील यांनी शेतातील मका रानडुक्करांपासून वाचवण्यासाठी शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणात करंट सोडला होता. विकास पावरा या मजुराचे कुटुंब याठिकाणी आले तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती. हे सगळे शेताच्या बाजूने असलेल्या पायवाटने जात असताना त्यांचा तारेच्या कुंपणाला स्पर्श होताच पाच जणांचा मृत्यू झाला. बराच वेळ या गोष्टीचा कोणाला पत्ता नव्हता. शेतमालक बंडू पाटील सकाळी शेतात गेले तेव्हा कुटुंबीयांच्या दोन वर्षांची दुर्गा कुटुंबीयांच्या मृतदेहापाशी बसून रडतानाचे हृदयद्रावक दृश्य त्यांना दिसले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा