जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) वर्षभरापासून काही आलबेल नाही, अशीच परिस्थिती आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांनी कंबर कसली असून त्यासाठी तयार सुरु केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका कल्पना महाजन यांचं नाव चक्क शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीत असून त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फोन आला होता. त्यानंतर कार्यकर्त्याने महिलेला चांगलेच खडसावले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निष्ठावान शिवसैनिकाचे उद्धव ठाकरे यांनी फोन करुन कौतुक केले.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका कल्पना महाजन यांचं नाव चक्क शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीत असून त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी फोन आला होता.
त्याचे झाले असे की, जळगावातील शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचे नाव हे शिवसेना शिंदे गटाच्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीत आले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातून संबंधित ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेला फोन करण्यात आला. मात्र हा फोन संबंधित माजी नगरसेविकेचे पती तथा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी उचलला. खासदार शिंदे यांच्या कार्यालयातून बोलत असून तुमच्या पत्नीचे नाव हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या यादीत आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार नावे व्हेरिफिकेशन करत असल्याचं संबंधित महिलेने फोनवर बोलताना सांगितलं. उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी फोनवर बोलणाऱ्या महिलेला चांगलाच खडसावलं. "माझे नाव ठाकरे गटात असताना माझ्या पत्नीला तुम्ही शिंदे गटात कसे घेता? पक्ष फोडला आता माझ्या बायकोला पण फोडून टाकले का? तुम्ही माझ्या घरात वाद लावून टाकला", असे म्हणत संबंधित महिलेला उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांनी चांगलेच खडसावले.
उद्धव ठाकरेंकडून निष्ठावान शिवसैनिकाचं कौतुक
दरम्यान संबंधित संभाषणाचे ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आणि त्यानंतर जळगाव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले. ही व्हायल ऑडिओ क्लिप उद्धव ठाकरे यांनी देखील ऐकली. त्यानंतर एरंडोलमधील निष्ठावान शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी फोन करुन कौतुक केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक करुन नेमका हा फोन कोणी करायला लावला याबाबत तपासणी करण्यास सांगितले.
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन आणि कार्यालयातील महिलेचे संभाषण जसेच्या तसे
महिला : कल्पना दशरथ महाजन यांच्याशी बोलायचे आहे. ..
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : काय बोलायचे?
महिला : तुम्ही कोण बोलत आहात त्यांचे?
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : माझा नंबर कोणी दिला तुम्हाला?
महिला : सर आपले नाव साहेबांच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीत आले आहे.
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : कुठल्या साहेबांच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत नाव आले आहे.
महिला : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : त्यांच्या यादीत माझे नाव आले आहे.
महिला : कल्पना दशरथ महाजन त्या नगरसेविका आहेत ना..
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : हो नगरसेविका आहेत.
महिला : साहेबांच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. साहेबांकडे जो डेटा आहे त्यात काही अपूर्ण नाव आहेत. साहेबांनी कॉल करुन माहिती व्हेरिफाय करायला सांगितले आहे. नाव तर बरोबर आहे ना त्यांचे कल्पना दशरथ महाजन...
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : का हो माझ्या बायकोला पण फोडून टाकलं तुम्ही माझ्या घरात पण वाद लावले...
महिला : काय झालं?
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : माझ्या घरात पण वाद लावला तुम्ही पक्ष फुटीचा मी उद्धव ठाकरे गटात आहे आणि माझ्या बायकोला तुम्ही श्रीकांत शिंदे गटात घेत आहेत. माझ्या घरात सुख नांदू द्या... राज्यात तर नांदू देत नाही...माझ्या घरात तर नांदू द्या..
महिला : कुठल्या गटात आहात सर तुम्ही
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : मी उद्धव ठाकरे गटाचा उपजिल्हाप्रमुख आहे...
महिला : आणि त्या...
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : तुमच्याकडूनच मला माहिती पडत आहे की माझ्या बायकोचं नाव श्रीकांत शिंदे यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीत आहे.
महिला : त्या नगरसेविकाच आहेत ना..
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : हो त्या नगरसेविका आहेत आणि मी माजी नगराध्यक्ष आहे..
महिला : तुम्ही कोण आहात?
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : मी माझी नगराध्यक्ष आहे एरंडोल इथला आणि शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा...
महिला : त्या मॅडम...
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : त्या मॅडम तर मला तुमच्याकडून माहिती पडलं. तिने तर मला कधी सांगितले नाही की मी शिंदे गटात आहे. आज मला तुमच्याकडून माहिती भेटली. माझ्या घरातच भांडण लागून गेलं. माझी बायको आणि मी वेगवेगळ्या पक्षात राहील तर कसं.. चालेल घर माझं.
महिला : तुम्ही कोणत्या पक्षात आहे सर मला सांगा...तसं मी ..
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : माझ्या बायकोचं नाव तुम्ही शिंदे गटात कसे घेतलं?
महिला : त्या नगरसेविका आहात ना त्यामुळे त्यांना फोन आलेला.... त्या कोणत्या गटात आहेत तुम्ही मला सांगा बस सर..
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : आता माझी बायको कुठल्या गटात आहे हे मी कसं सांगू तुमच्याकडून मला माहिती मिळाली की.. तिचं नाव तुमच्या लिस्टमध्ये आहे.. तुमच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर पण असला पाहिजे होता.
महिला : ठीक आहे.. सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : माहिती दिल्याबद्दल तुम्ही माझ्या घरात भांडण लावून दिलं आता कसं काय करु मी? घरातला वाद कसा मिटवू?
महिला : त्यांचा नंबर मिळेल का? मग ते सांगतील कोणत्या गटात आहे ते
उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन : ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचा पदांनी नाव काढलं त्या पद्धतीने तुम्ही त्यांचा नंबरही काढून द्या माझ्या विरोधी पक्षातला माणसाचा नंबर कसा मी तुम्हाला देऊ..
महिला : बरं चालेल सर.....
(टीप : श्रीकांत शिंदे यांच्याकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शिंदे गटाची बाजू समोर आल्यानंतर ती मांडली जाईल.)