जळगाव : शहरातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसतिगृहात तैनात असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर सात दिवसांनी ही घटना उघडकीस आली. किरकोळ वादातून सहकारी मुलींकडूनच मारहाण करण्यात आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी वसतिगृहाच्या अधीक्षिका सोनिया देशमुख या दोषी असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे.

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशीत वसतिगृहाच्या अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झालं.

जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी रफिक तडवी यांनी या घटनेची माहिती दिली. या प्रकरणात महिला आणि बालविकास आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या आधीही अनेक तक्रारी

आशादीप वसतिगृहातून एप्रिल महिन्यात एक बांगलादेशी तरुणी फरार झाली असून अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. असं असताना देखील वसतिगृहातील एका तरुणीला बेकायदेशीररित्या दोन दिवस बाहेर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. याबाबत अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी कुठलीही माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच वसतिगृहात दाखल बलात्कार पीडित तरुणीचे नाव उघड करण्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

ही बातमी वाचा :