जळगाव: जिल्ह्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत असताना संरक्षण भिंत अंगावर कोसळल्याने 13 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-13 रा., वरची अळी नशिराबाद ता, जळगाव) असं मयत मुलाचं नाव आहे. संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली असून जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा त्यांनी घेतला आहे. सायंकाळपर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता.
नशीराबाद गावातील वरची अळी भागात मोहित हा त्याच्या कुटुंबियासह वास्तव्यास होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षेच्या नंतर सुट्ट्या असल्यामुळे तो घरी होता. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास तो मित्रांसोबत घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत होता. खेळता खेळता भिंतीला धक्का लागला असता, अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मुलाच्या मृत्यूने त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला.
गेल्या सात महिन्यापूर्वी या शाळेच्या संरक्षण भिंतींचे काम करण्यात आले आहे. काही कारणास्तव ते बांधकाम अपूर्ण राहिले आहे, ते काम पूर्ण न झाल्याने तसेच ठेकेदाराने भिंतीचे काम हे चांगल्या दर्जाचे केलेले नसल्यामुळे ती आज अचाकन कोसळली आणि यामुळे निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेडे यांनी केला आहे.