जळगाव : "बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सीडेंट हो जाएगा" असं म्हणत निवडणुकीत पडल्यावर मी पण सुधारलो अशी कबुली राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. ते जळगावात (Jalgaon) बोलत होते. निवडणुकीत पडल्यावर लक्षात आलं की हायवेला स्पीडब्रेकर का असतात. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो, अशा कोट्याही गुलाबरावांनी केल्या. निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 


तो आयुष्यातील दु:खाचा दिवस


सेनेत मंत्री असताना दुर्गम भागात पाण्याच्या योजना आम्ही सुरू केल्या. लोकांना पाणी मिळू लागले आणि त्यांचा आम्हाला मिळू लागलेला प्रतिसाद हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण राहिला आहे. दुसरीकडे शिवसेनेत ज्यावेळी हा प्रकार घडला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांनी आम्ही सांगितलेले ऐकले नाही, त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. हा आपल्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 


आता भाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय


मला आता भाऊ राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे. सरकारने  जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे  जे उद्दिष्ट ठेवले आहे,  ते पूर्ण करण्याचा आणि बाळासाहेबांची शिवसेना गावा-गावापर्यंत पोहोचवून भगवामय जिल्हा करण्याचा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणाले. 


संभाजीराजे धर्मवीर आहेत, धर्मवीर राहतील


संभाजीराजे हे आमच्यासाठी धर्मवीर आहेत आणि धर्मवीर राहणार आहे. त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्याबाबत असं बोलणं उचित नाही. संभाजीराजे यांनी धर्मासाठी काय नाही केले? त्यांचे डोळे काढले गेले, त्यांचा किती छळ करण्यात आला,तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही,ते धर्मवीर आहेत आणि धर्मवीरच राहणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 


एकनाथ खडसेंना टोला


अधिवेशनात केवळ आरोप प्रत्यारोप झाले, प्रश्न सुटले नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याला गुलाबरावांनी उत्तर दिलं. खडसे यांचा बोदवडचा प्रश्न सुटला आहे, त्यांच्याकडे आता प्रश्नच राहिले नाहीत, ते तर काम करण्याचे महामेरू आहेत असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.  


देशमुख-संजय राऊतांच्या जामीनावर भाष्य


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकारची कारवाई ही लोकप्रतिनिधी करीत नसतात, तर त्यासाठी यंत्रणा काम करत असते. जामीनही कोर्ट देत असते त्यामुळे शरद पवार यांचे म्हणणे उचित नाही. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकरण करू नये अशी आपली नम्र विनंती आहे, असं गुलाबरावांनी सांगितलं.  


Video :  गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया 


 


संबंधित बातमी


Gulabrao Patil : आपलं बाळू आणि दुसऱ्याच काळू असं कसं चालेल? Eknath Khadse यांना टोला