Gulabrao Patil on Manoj Jarange Patil : 'हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडं वेट अँड वॉच करावं लागेल. ओबीसी (OBC) आणि मराठा (Maratha) समाज हा आजपर्यंत कायम भाऊबंदकीसारखा राहिला आहे. यापुढेही कायम राहिला पाहिजे असेच त्यांनी पुढचे निर्णय घ्यावे', अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यावर दिली आहे. 


सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर स्थगित केलेलं उपोषण आंतरवालीत 20 तारखेला पुन्हा सुरु करणार आहे. आता कठोर उपोषण होईल. आता मेलो तरी माघार नाही. पण मराठ्यांवर गुलाल मी टाकणार आहे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, आरक्षणासाठी सरकार ज्या पद्धतीने शक्य होईल, त्या पद्धतीने काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आरक्षण दिलं होतं. मात्र, कालांतराने ते टिकलं नाही. आताही सरकारमधील सर्व मंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के आरक्षण दिलेले आहे. 


हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडं वेट अँड वॉच करावं लागेल


यावर पुढचाही तोडगा काढण्याकरता सरकार सक्रिय आहे. शेवटी हैदराबादच्या नोंदी आणायच्या असतील तर थोडं वेट अँड वॉच करावं लागेल. ओबीसी आणि मराठा समाज हे दोघेही भाऊ असल्याने त्यांच्यात कटूता निर्माण होऊ नये. त्यामुळे दोन्ही बाजूने शांतता पाळली पाहिजे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. निवडणुकीत उमेदवार उभा करायचा की नाही हा त्यांचा विषय आहे. मात्र, इतर सुद्धा आपले भाऊच आहे हे त्यांनी मानलं पाहिजे. ओबीसी आणि मराठा समाज हा आजपर्यंत कायम भाऊबंदकीसारखा राहिला आहे. यापुढेही कायम राहिला पाहिजे असेच त्यांनी पुढचे निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 


महिन्याभरात संपूर्ण टँकर बंद होतील


राज्यात पावसाला सुरुवात होऊन देखील अजूनही काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, पाऊस झाला असला तरी अद्यापही काही गावांमध्ये पाण्याची टँकर सुरू आहेत. जोपर्यंत नदी नाले वाहत नाहीत, पाण्याची पातळी वाढत नाही, तोपर्यंत टँकर सुरूच राहतील. तरीही सध्या जो पाऊस आहे तो समाधानकारक आहे. त्यामुळे या महिन्याभरात संपूर्ण टँकर बंद होतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का? रोष अंगावर का घेताय? मनोज जरांगे बरसले!