Girish Mahajan : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) हे येत्या 15 दिवसात पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती त्यांनी जळगावात माध्यमांशी बोलताना दिली होती. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर (Eknath khadse Will Join BJP) त्यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.    
 
गिरीश महाजन म्हणाले की, खडसेंचा प्रवेश कधी होणार हे त्यांनाच माहीत आहे. खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी, अमित शाहांशी आहे. एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला की,  आमची काय भूमिका राहणार आहे. ते रोज दिल्लीला जाताय आणि येताय. रोज सांगताय झालय. आता त्यांनी सांगितलंय 15 दिवसांनी जमणार आहेत वाट बघू. 


खडसेंचा पक्षप्रवेश माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही


एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. खडसेंचा पक्षप्रवेश माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही. ते खूप मोठे नेते आहेत भाजपाचे, म्हणजे होते. त्यांचा प्रवेश असा खालती होणार नाही. मुंबईत होणार नाही असं ते म्हणतात.   माझा प्रवेश दिल्लीत आहे, माझ्या सगळ्या ओळखी आहेत, असे ते म्हणतात. ते फार मोठे आहेत. त्यांच्याविषयी फार बोलणं संयुक्तिक नाही, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.  


हिंगोलीची जागा शिंदेंची असल्याने सर्व अधिकार त्यांना


हिंगोलीत हेमंत पाटील (Hemant Patil) यांची उमेदवारी कट झाल्याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, भाजपच्या प्रेशर खाली झाल असं मला वाटत नाही. जनमत, कार्यकर्त्यांचे मत, खरं आहे. मधल्या काळात हेमंत पाटलांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नव्हता. हे सगळ्यांचे मत होतं. शिंदेंची जागा असल्यामुळे तो सर्व अधिकार त्यांचा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला. जनमत घेतले त्यानंतर ती जागा बदलली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


जरांगे पाटलांच्या भूमिकेचा भाजपला फटका बसणार नाही


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेबाबत गिरीश महाजन म्हणाले की, जरांगे पाटलांच्या भूमिकेचा भाजपला फटका बसणार नाही. जरांगे पाटलांनी कुणाला पाठिंबा दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही लोकांनी प्रयत्न केला त्यांनी राजकारणात यावं. त्यांनी उमेदवार द्यावा. मला वाटते राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. आता प्रत्येक जण कोणी कोणाला मतदान करावं यासाठी मोकळा आहे. 


शिवसेना पवार साहेबांनी चालवली आणि त्यांनीच संपवली


महायुतीतील तिन्ही पक्ष फडणवीस चालवतात असं जयंत पाटील म्हणाले होते. याबाबत गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले की, मला वाटतं या म्हणण्याला किती गांभीर्य आहे. अजितदादा सक्षम नेते आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा सीएम आहेत ते सक्षम आहेत. तीन पक्ष आम्ही एकमताने चालवतो. आम्ही कुरघोडी करत नाही, पण जयंतरावांना असं का वाटतं ? शरद पवार साहेब उद्धव ठाकरे यांना चालवत होते म्हणून त्यांना तस वाटतं का ? सगळी शिवसेना पवार साहेबांनी चालवली आणि त्यांनीच संपवली, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 


आणखी वाचा 


एकनाथ खडसेंना भाजपमध्ये घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगितलं!