Raver Lok Sabha Constituency:  उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे, रावेर मतदारसंघ (Raver Constituency). भाजपाला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) सक्षम उमेदवाराचा शोध  अनेक दिवसांपासून घेत होती. अखेर हा शोध संपला असून अ‍ॅड. रवींद्र भैय्या पाटील यांची रावेर च्या लोकसभा मतदार संघातून वर्णी लागली आहे. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरजचंद्र पवार गटातील सूत्रांनी दिली आहे.


रावेर मतदार संघात  राष्ट्रवादीला  (शरदचंद्र पवार गट) सक्षम उमेदवार मिळत नसल्याने तारीख पे तारीख सुरू असा सिलसिला गेले काही दिवस सुरू होता. या संदर्भात  मुंबईत बैठक घेण्यात आली. अखेर रावेर मतदारसंघाचा तिढा सुटला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अ‍ॅड रवींद्र भैय्या पाटील यांची रावेर च्या लोकसभा मतदार संघातून वर्णी लागली आहे.  अ‍ॅड रवींद्र भैय्या पाटील  हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आज संध्याकाळ पर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रावेर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.


रावेर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत  चुरस


रावेर मतदारसंघ म्हणजे, एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजनांचा (Girish Mahajan) बालेकिल्ला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.गेली अनेक वर्ष भाजपच्या तावडीत असलेला रावेर मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मात्र चुरस दिसून येत आहे.  आगामी लोकसभेसाठी भाजपनं रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे.  त्यामुळे या जागेसाठी  सक्षम उमेदवाराचा शोध गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीकडून सुरू होता. अखेर अ‍ॅड रवींद्र भैय्या पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे.रावेर आणि मलकापूर येथे काँग्रेसचे आमदार असून रावेरमधून शिरीष चौधरी आणि मलकापूरमधून राजेश एकाडे आमदार आहेत.  


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत सातारा, माढा आणि रावेर या तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातूनअॅड रवींद्र भैय्या पाटील , सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख आणि अभय जगताप यांच्यापैकी एका नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 


हे ही वाचा :


एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाची घोषणा, कट्टर विरोधक चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...