Girish Mahajan: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे संकटमोचक नेते म्हणून ओखळले जातात. गिरीश महाजन आपल्या चातुर्याने सर्व प्रश्न सोडवतात. म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे. मात्र, गेल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संकटमोचक गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि त्यांनी थेट दुचाकीवर बसून पळ काढावा लागला. या व्हिडिओबाबत आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
जामनेर तालुक्यातील लिहा तांडा गावातील रस्त्याच्या बाबत काल माझी क्लिप व्हायरल करण्यात आली. यामध्ये विरोधकांचे राजकारण आहे. लिहा तांडा गावात पाऊस झाल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याने चिखल झाला असल्याचं मला ही पाहायला मिळाले, मात्र, या गावाच्या विकासासाठी आणि रस्त्यासाठी निधी अगोदरच मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे काम होतील. मात्र, विरोधक याबाबत राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे गावामधील अनेक कार्यकर्ते हे पूर्वी पासूनच भाजपाचे कार्यकर्ते राहिले आहेत. आजही ते आपल्या सोबत आहेत,कोणताही गोंधळ या ठिकाणी झाला नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांनी माझ्याबाबत 'एबीपी माझा'च्या माझा कट्ट्यावर जे काही बोलले आहेत, त्याला आपणही माझा कट्ट्यावर जाऊन उत्तर देणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाच्याबाबत देवेंद्र फडणीस काय बोलले हे मला माहित नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते जो निर्णय घेतील, ते भाजपा मध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचं ही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे.
लिहा तांडा गावात नेमकं काय घडलं?
भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) दोन दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील लिहा तांडा या गावी कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी या गावातील रस्त्यांची स्थिती फारच बिकट असल्याचे निदर्शनास आलं. यावरुनच गिरीश महाजन यांना गावातील स्थानिक तरुणांनी जाब विचारला होता. तरुणांचा हा आक्रमकपणा पाहून गिरीश महाजन यांनी कोणतेही उत्तर न देता दुचाकीवर बसून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये, रस्त्यांची फारच वाईट परिस्थिती दिसून येत आहेत. खराब रस्त्यांबाबत गावातील तरुण त्यांना जाब विचारतांना दिसत आहेत. मात्र, गिरीश महाजन त्यांना उत्तर न देता दुचाकीवर बसून चिखल असलेल्या खराब रस्त्यातून वाट काढत निघून जातात. गिरीश महाजन यांच्या या कृतीवरुन स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा हा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
अंबादास दानवे यांनी शेअर केला व्हिडिओ
"ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना तरुणांनी विचारला जाब जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला...' जामनेर तालुक्यात एकच चर्चा." अशी कॅप्शन देत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.