जळगाव : भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईने आपल्यावर सेवा मुक्त करण्याची अन्यायकारक कारवाई करण्यात आली. त्यामुळे आजपासून जळगाव (Jalgaon) येथे उपोषण करत असल्याचा इशारा माजी सैनिक चंदू चव्हाण (Chandu Chavan) यांनी दिला आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देशाच्या सीमेवर सेवा बजावत असताना पाकिस्तानात (Pakistan) शिरल्याने पाक लष्कराने, चंदू चव्हाण या जवानाला अटक केली होती. तीन महिन्यांच्या करावासानंतर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर भारतीय लष्कराने (Indian Army) चंदू चव्हाण यांच्या विविध चौकशा केल्या होत्या.
पुढील जीवन जगायचे कसे?
या चौकशी दरम्यान चंदू चव्हाण यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने भारताच्या लष्करातून चंदू चव्हाण यांना बरखास्त करण्यात आले होते. मात्र काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईमुळे आपल्याला नोकरी गमवावी लागली आहे. अकरा वर्ष देशसेवा केल्यानंतर आपल्याला सेवा समाप्तीनंतरचे कोणतेही लाभ दिले गेले नसल्याने पुढील जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाल्याचे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.
अन्यायकारक कारवाई का?
पाकमधून आलेल्या सीमा हैदरला सरकार सुविधा देते. शरण आलेल्या अतिरेक्यांना, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सुविधा देते. मग आपण अकरा वर्ष देशसेवा केल्यानंतर आणि पाकमध्ये तीन महिने कारावास सहन केल्यानंतर आपल्यावर अशी अन्यायकारक कारवाई का? असा सवाल उपस्थित करत चंदू चव्हाण यांनी आजपासून आपल्या परिवाराच्यासह जळगाव (Jalgaon) येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मागण्यांकडे सरकार लक्ष घालेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या ताब्यात होते 3 महिने 21 दिवस
दरम्यान, चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी आहेत. भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यावर पाकिस्तानने त्यांना पकडले होते. पाकिस्तानच्या ताब्यात 3 महिने 21 दिवस होते. यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. सरकारने मोठे प्रयत्न करून त्यांना भारतात आणले होते. भारतात परतल्यानंतर देशवासीयांनी मोठा जल्लोष केला होता. आता चंदू चव्हाण यांनी भारत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या