जळगाव : जळगावच्या एरंडोल तालुक्यात बुधवारी पहाटे शॉक लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला, पुरुष आणि लहान मुलांचा मृत्यू झाला.
शेतातील कुंपणाच्या तारेला वीजेचा करंट
वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे पिके वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेताच्या भोवती लोखंडी तारांचे कुंपण घातले होते. पण दुर्दैवाने, या विजेच्या प्रवाहाची कल्पना नसलेल्या मजुरांचा या कुंपणाशी संपर्क आला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. घटनास्थळीच सर्वांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पहाटेच गावात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना वन्यजीवांमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शेतकरी संरक्षणासाठी विजेच्या तारा ओढण्याचा मार्ग अवलंबतात. मात्र, अशा घटनांमुळे मानवी जीवितहानी होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत वीजेचा झटका बसून मुलाचा मृत्यू
मुंबईतील भांडूपमध्ये रस्त्यावरती खुले असलेल्या विजेच्या तारांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. मृत्यू झालेल्याचे नाव दीपक पिल्ले असून तो फक्त 17 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. त्याने कानात हेडफोन घातले होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी केलेले इशारे त्याला ऐकू आले नाहीत. रस्त्यावर महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती, आणि त्याच्याशी संपर्कात येताच विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा -