जळगाव: भाजपमध्ये परत यावे असा आपल्याला अनेकजण आग्रह करत असले तरीही आपण शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांच्या सोबतीने असू असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे. भाजपच्या खासदार आणि खडसेंच्या सून रक्षा खडसे यांनी त्यांना भाजपमध्ये परत यावं असं आवाहन केलं होतं. त्यावर एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता एकनाथ खडसेंच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं दिसून येतंय.
काय म्हणाल्या होत्या रक्षा खडसे?
एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या म्हणाल्या होत्या की, गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे भाजपामध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही कारणास्तव आपल्याला भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात यावे लागले. आता मात्र आपण शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केलं असून पुढील काळात देखील आपण राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबतच राहणार. भाजपमध्ये जायचे असते तर अगोदरच गेलो असतो. कदाचित अजितदादा यांच्या सोबत गेलो असतो. मात्र आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आपले नाव चर्चेत आहे. त्याला शरद पवार आणि जयंत पाटील यांची मान्यताही आहे. मात्र आपल्या आजारपणाचा विचार करता डॉक्टरांचा सल्ल्याने आपण पुढील निर्णय घेणार आहे. त्यांनी होकार दिला तर आपण राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊ.
मागील काळात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांच्या मालमत्तेवर शासनाचा बोजा लावला जात असल्याचे सांगितले होते. या विषयात एकनाथ खडसे यांनी मौन बाळगणे पसंत केलं.
मराठा आरक्षण प्रश्नांवर सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, सगेसोयरे शब्द गिरीश महाजन यांनी लिहून दिला होता, तो सरकारला पाळता आता नाही. म्हणून मराठा समाज आक्रमक झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.
ही बातमी वाचा :
- मोठी बातमी : एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं, खासदार सून रक्षा खडसेंचं आवाहन, लोकसभेपूर्वी धमाका करणार?