Eknath Khadse and Gulabrao patil : शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे वेळ मिळाली की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. एकमेकांवर कडाडून टीका करण्याची संधी एकदाही सोडत नाहीत. मात्र आज जळगावतील सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात हे दोन्ही नेते एकत्र दिसून आले. दोघांनी एकमेकांची भेट घेत गप्पा केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. एकमेकांवर जोरदार टीका करणारे दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, वर्सी महोत्सवात बाबाच्या दर्शनासाठी आलो होतो. तर एकनाथ खडसे हे सुद्धा दर्शनासाठी आले होते. मात्र आता बाबा कोणाला प्रसन्न होतात असा उपवासात्मक टोला सुद्धा यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला. खडसे यांच्यासोबत काही चर्चा झाली का असे विचारले असता दर्शन घ्यायला तेही आले होते व दर्शन घ्यायला मी सुद्धा आलो होतो. त्यामुळे कुठलीही चर्चा झाली नाही, असे सुद्धा यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. बैठकीच्या निमित्ताने आम्ही एकत्र येत असतो. आज या ठिकाणी मंदिरात बैठक झाली, त्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो. राजकारणात कुणी कुणाचे शत्रू नसतं, हे मी मानतो. एकमेकांचे वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यामुळे एकमेकांची दुश्मनी असता कामा नये. एकमेकांचे शत्रू म्हणून असता कामा नये, मित्रत्वाचे संबंध कायम असले पाहिजे, अशी भावना ही यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. दोघांनी एकत्र यावी अनेकांची इच्छा आहे, यावर विचारले असता, विचाराने एकत्र येवू शकलो नाही, तरी आचाराने एकत्र येवू शकतो असेही मत यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.
गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र -
मंत्री गिरीश महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या दबावामुळे जिल्हा दूध संघातील चोरीचा पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेचा ही एकनाथ खडसे यांनी समाचार घेतला तू कल का छोकरा आहे तुझं वय जेवढा आहे तेवढा माझा राजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे तू काय मला शिकवणार अशा शब्दात एकनाथ खडसेंनी मंगेश चव्हाण यांच्यावर टिका केली आहे.