बुलढाणा :  काही दिवसांपूर्वी तेलंगणातून जळगावला नातेवाईकांच्या येथे विवाह सोहळ्यासाठी स्वतःच्या कारने जाणारे पती-पत्नी बेपत्ता (Buldhana Accident) झाल्याची घटना समोर आली होती. त्या घटनेच्या काही दिवसांनंतरच त्या दोघांचे मृतदेह कारसह वडनेर भोलजी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या एका विहिरीत आढळून आले होते. या घटनेनं खळबळ उडाली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने यामागचं रहस्य उलगडलं आहे. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये विरुद्ध दिशेने आलेल्या एका वाहनाने या दांपत्याच्या (Buldhana Accident)  कारला कट मारल्यानेच अनियंत्रित झालेली कार विहिरीत पडून अपघात झाल्याचे समोर आल्यानंतर नांदुरा पोलिसांनी १० डिसेंबरला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Buldhana Accident) 

Continues below advertisement

Buldhana Accident News : नेमकं काय घडलं होतं?

जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खाजगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते व त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कार क्रमांक एम एच 13 बी एन 8583 ने जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्याला जाण्यासाठी निघाले होते. त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं होतं. मात्र, त्यानंतर हे दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली. त्यानुसार, पोलिसांचे पथक या दांपत्यांच्या शोधासाठी रवाना झाले असतानाच परिसरातील एका विहिरीत कार आढळून आली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या दांपत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशय ही व्यक्त होत होता. 

मात्र, वडनेर भोलजी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या बाजूला एका विहिरीत पांढर्‍या रंगाची एक कार आढळून आली, ही कार पाटील दांपत्याची असण्याची शक्यता वर्तवली जात होती. पाटील दांपत्य तेलंगणाहून जळगावकडे जात असताना अचानक हे दाम्पत्य बेपत्ता झाले होते. त्यानंतर, पोलिसांनी गेल्या 24 तासापासून पोलिसांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ती कार बाहेर काढली असता आतमध्ये दोघांचेही मृतदेह आढळल्याने सर्वांना धक्का बसला. एका गाडीने कट मारल्याने हा भीषण अपघात झाला होता, त्यामुळे कार रस्त्यालगत असलेल्या विहीरीमध्ये कोसळली. नातेवाईकांनी घटनास्थळीच्या परिसरात असलेल्या हॉटेल विश्व गंगा येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. वडनेरकडून मलकापूरकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने कारला कट मारल्यामुळं अनियंत्रित होऊन कार रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याचे स्पष्ट झाले.

Continues below advertisement

यामुळे पाटील पती पत्नी या दोघांच्या मृत्यूला अज्ञात वाहन चालक जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध दहा डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ संदीप रमेश पाटील (वय वर्ष 50, रा. वाघुळखेडा ता. पाचोरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम 281 106 बी एन एस सह कलम 119 134 अन्वये होण्याची नोंद केली आहे याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.