सांगली : प्रेयसीची हौस भागवण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका प्रेमवीराला इस्लामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या तोंडावर या प्रेमावीराला इस्लामपूरमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीसाठी चोरी करत असताना या चोराला मागील वर्षी 25 फ्रेब्रुवारीच्या आसपासच अटक केली होती. अटकेनंतर तो काही काळात जामिनीवर सुटला होता.


मागील 5-6 महिन्यामध्ये मात्र तो आपल्या प्रेयसीसाठी पुन्हा चोऱ्या, घरफोडी करू लागला होता. कुणाल शिर्के असे या प्रेमवेड्या चोरट्याचे नाव आहे. रेकॉडवरील गुन्हेगार असून देखील तो पुन्हा चोरी करू लागलाय हे पोलिसांना लक्षात येईपर्यंत त्याने इस्लामपूर आणि कोल्हापूरमध्ये हात साफ करत सात घरफोड्या केल्या. ज्यावेळी पोलिसांना पुन्हा त्याच्यावर संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवत त्याला अटक केली असता तेव्हा देखील आपण प्रेयसीसाठीच चोऱ्या करून पैसे जमवत असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारला.


मागील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये चक्क प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी चोरी करणारा आणि "सब पागल है." असा टी शर्ट घातलेला एक अनोखा चोरटा आम्ही दाखवला होता. आता मात्र हा खरच तो त्याच्या प्रेयसीसठी पागल झालाय असे म्हणण्याची वेळ आलीय. कारण हा पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. कारण तेच, प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी चोरी. पण हा चोर मागील वर्षी अटक झाल्यानंतर जेलमधून बाहेर कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. त्याचे झाले असे की अटकेनंतर त्याला मिळाला जामीन. जामीन मिळाल्यानंतर कोरोना काळात तो काही काळ जरा शांत राहिला अन् अलिकडच्या 4-6 महिन्यात पुन्हा चोरीचा पॅटर्न राबवला अशी पोलिसांनी माहिती दिलीय.


एक वर्षांपूर्वी कुणाल याने प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी इस्लामपूर पोलिसांनी कुणाल याला फेब्रुवारी महिन्यातचं बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पुन्हा जामिनावर कुणाल बाहेर होता आणि प्रेयसीवर असणाऱ्या प्रेमापोटी आणि आपल्या प्रेयसीला खुश करून तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्याने घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून इस्लामपूर शहरातील 5 व कोल्हापूर जिल्ह्यातील 2 अश्या 7 घरफोड्या उघडकीस आणत सहा लाखांच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे हे सोन्याचे दागिने तो आपल्या प्रेयसीजवळ ठेवत असल्याचे समोर आले आहे.