चेन्नई : जगभरात शेतीसाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत असला तरी भारतात मात्र अद्यापही पारंपारिक पद्धतीनं शेती केली जाते. पर्यायानं उत्पादन क्षमता कमी होते. मात्र, आता हळूहळू शेतकरी तंत्रज्ञानाकडे वळू लागला आहे.

शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा व्हावा यासाठी आता अनेकजण पुढाकार घेऊन काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न तामिळनाडूतील मनोहर संबदम यांनी केला आहे. मनोहर यांनी भारतातील पहिलावहिला कापूस वेचणारा रोबोट तयार केला आहे.

मनोहर संबलम यांनी टेक्सास इंस्ट्रुमेंट्स आणि ब्रॉडकॉम सारख्या कंपनीमध्ये 25 वर्ष डिझाइन आणि चिप्स यासाठी काम केल्यानंतर त्यांनी तमिळनाडूमध्ये शेती सुरु केली. मनोहर यांचं कुटुंब सुरुवातीपासूनच शेती करत होतं. त्यामुळे शेती हा यशस्वी व्यवसाय कसा करता येईल यासाठी ते उत्सुक होते.

सुरुवातीला त्यांनी आपल्या शेतात भात लावला. पण त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात कापूस लावला. दरम्यान, कापूस काढणीवेळच्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. अनेकदा कापूस काढणी कामगाराचे हात काढणी वेळी कापले जायचे. तसेच अनेकदा कामगारही मिळायचे नाही. यावर उपाय म्हणूनच मनोहर यांनी कापूस काढणीसाठी रोबोट तयार करण्याचा चंग बाधला.

त्यानंतर त्यांनी अथक प्रयत्न करुन हे रोबोट तयार केलं. ज्याला मागील वर्षी कर्नाटक सरकारचा पुरस्कारही मिळाला.

कल्पकतेचा वापर करुन त्यांनी हे रोबोट तयार केलं. सुरुवातीला चौघांच्या कोअर टीमनं या रोबोटवर काम सुरु केलं.

'जगात अनेक ठिकाणी शेतीमध्ये रोबोचा वापर होतो. त्यामुळे आम्ही जे काही तयार करत आहोत त्याचा फायदा इतर शेती उत्पादनासाठी देखील होईल.' असं मनोहर यावेळी म्हणाले.

VIDEO :