तुम्हाला यापुढे ऑनलाईन फूड डिलीव्हरी फर्म झोमॅटोच्या (Zomato) अॅपवर किराणा वितरण सेवा (Grocery Delivery Service) मिळणार नाही. फूड टेक प्लॅटफॉर्मने आपली नुकतीच सुरू केलेली किराणा वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांचा वाईट अनुभव आणि प्रतिस्पर्ध्यांकडून वाढती स्पर्धा यामुळे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे कंपनीने 15 मिनिटांत एक्सप्रेस डिलिव्हरीचं आश्वासन आता हेवत विरुन गेलं आहे.


कंपनीकडून वृत्ताला दुजोरा


कंपनीने म्हटले आहे की ग्रॉफर्समधील (Grofers) गुंतवणूकीचे त्याच्या इन-हाउस ग्रॉसरी प्रयत्नांपेक्षा चांगले परिणाम मिळतील. झोमॅटोने त्यांच्या किराणा भागीदारांना पाठवलेल्या मेलची प्रतही मिळाली आहे. झोमॅटोच्या प्रवक्त्याने किराणा वितरण सेवा बंद केल्याची पुष्टी केली आहे.


झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आमचे किराणा पायलट प्रोजेक्टला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर इतर कोणत्याही प्रकारची किराणा वितरण चालवण्याची कोणतीही योजना नाही.


कंपनीने अलीकडेच 100 मिलियन डॉलर (745 कोटी रुपये) गुंतवणूकीसह ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्म ग्रोफर्समध्ये काही भाग खरेदी केला होता. कंपनीचे सीएफओ अक्षत गोयल म्हणाले होते की, झोमॅटोने या नवीन क्षेत्रात अधिक अनुभव मिळवण्यासाठी आणि व्यवसायाची योजना आखण्यासाठी ग्रॉफर्समध्ये भागभांडवल खरेदी केले आहे. ते म्हणाले की आम्ही लवकरच झोमॅटो अॅपवर किराणा मालाची ऑनलाईन विक्री करण्याची सेवा सुरू करू आणि यासह आम्ही या क्षेत्रात पाऊल टाकू आणि आपण किती वेगाने प्रगती करतो ते पाहू.


आता फक्त ऑनलाईन फूड मिळणार


झोमॅटोने 11 सप्टेंबर 2021 रोजी त्याच्या किराणा भागीदारांना पाठविलेल्या मेलमध्ये असे म्हटले आहे की त्यांनी 17 सप्टेंबरपासून पायलट किराणा वितरण सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने निवडक बाजारांमध्ये किराणा सेवा पायलट सुरू केली होती. याअंतर्गत, ग्राहकांना 45 मिनिटांच्या आत किराणा वितरण करण्याची ऑफर देण्यात आली.