हैदराबाद : विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे पक्षाचे शिल्पकार वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल ईएसएल नरसिम्हा यांनी जगनमोहन रेड्डींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागा मिळवत तेलुगू देसम पक्षाला धूळ चारली होती.
जगनमोहन रेड्डींनी दुपारी सव्वाबारा वाजता तेलुगू भाषेतून शपथ घेतली. विजयवाड्यातील आयजीएमसी स्टेडियममध्ये वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रेड्डींचा शपथविधी पार पडला. रेड्डींच्या मंत्रिमंडळातील अन्य आमदारांचा शपथविधी सात जून रोजी होण्याची शक्यता आहे.
जगनमोहन रेड्डींच्या शपथविधी सोहळ्याला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन, पुद्दुचेरीचे आरोग्यमंत्री मल्लादी कृष्णा राव उपस्थित होते. रेड्डी यांच्या मातोश्री आणि वायएसआर काँग्रेसच्या मानद अध्यक्षा वाय एस विजयम्माही लेकाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होत्या.
आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायुडू मुख्यमंत्री झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसने आंध्रमधील 25 पैकी 22 जागा मिळवल्या होत्या.
वायएस जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2019 04:17 PM (IST)
विजयवाड्यातील आयजीएमसी स्टेडियममध्ये वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -