नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून होणाऱ्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी सात वाजता जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा विराजमान होतील.
राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेप्रमाणे व्यवस्था या सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. आर्मी, वायुसेना आणि दिल्ली पोलिसांच्या 10 हजाराहून अधिक जवानांची फौज या सोहळ्यासाठी तैनात करण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये परिसरातील इमारती आणि महत्वाच्या जागांवर वायुसेनेचे अँटी एअरक्राफ्ट गन आणि भारतीय सेनेच्या स्नायपरसोबत एनएसजीचे विशेष कमांडो आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात केले आहेत. जवळ असणाऱ्या हिंडन, पालमसह एअरफोर्स स्टेशनांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. कामाचा दिवस असल्याने सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी तगडी व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी समारोहासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनांच्या पार्किंगच्या जागांवर देखील चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
बिमस्टेक आणि अन्य 8 देशांच्या प्रमुखांसह तब्बल 8 हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी राष्ट्रपती भवनासमोर मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. या सोहळ्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांना खास मेजवानी देण्यात येणार आहे.
दरम्यान, मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला रवाना झाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 'रायसीना हिल' वर पाहुण्यांची मांदियाळी, सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2019 08:04 AM (IST)
या सोहळ्यासाठी विविध देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती एकाच स्थानी येणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या प्रोटोकॉलप्रमाणे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -