नवी दिल्ली : तुमचा मोबाईल क्रमांक, बँक खातं यांसह इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. आता तुमची मालमत्ताही आधार कार्डशी लिंक करावी लागणार आहे. गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

काळ्या पैशावर टाच आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचं हरदीप पुरी यांनी सांगितलं. ते ‘ईटी नाऊ’शी बोलत होते. मालमत्ता आधार कार्डशी लिंक केली तर काळ्या धनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.

सरकारने याबाबत अद्याप आदेश जारी केलेला नाही. मात्र सध्या बँक खात्यांशी आधार लिंक केलं जात आहे, तर मालमत्तांसाठीही केलं जाऊ शकतं, असं हरदीप पुरी यांनी सांगितलं. त्यामुळे आता घरही आधारशी लिंक करण्याचा निर्णय सरकार घेतं का, याकडे लक्ष लागलं आहे.

31 डिसेंबर आणि 6 फेब्रुवारी या दोन तारखा महत्त्वाच्या असतील. कारण 31 डिसेंबर पर्यंत बँक खात्याशी आधार लिंक करायचं आहे. तर 6 फेब्रुवारीपर्यंत मोबाईल नंबर आधारने रिव्हेरिफाय करायचा आहे.