नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरुन काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधकांचा सामना करण्याची पंतप्रधान मोदींमध्ये हिम्मत नसल्याने ते अधिवेशन लांबणीवर टाकत असल्याचा आरोप काल सोनिया गांधींनी केला. त्याला अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी डिसेंबरमध्येच अधिवेशन होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी जीएसटी अंमलबजावणीचा दाखला देत संसदेचं हिवाळी अधिवेशन जाणूनबुजून लांबणीवर टाकलं जात असल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या काळातही अधिवेशन लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगून पलटवार केला.

त्यानंतर आज रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरमध्येच अधिवेशन होणार, असं स्पष्ट केलं.

 


"संसदेच्या परंपरेवरील काँग्रेसचं वाढतं प्रेम पाहून आश्चर्य होत आहे. राहुल गांधी अधिवेशन काळात किती काळ संसदेच्या सभागृहात उपस्थित राहतात? हे काँग्रेसनं आधी स्पष्ट करावं," असा टोला रविशंकर प्रसाद यांनी यावेळी लगावला.

दुसरीकडे काँग्रेसने हिवाळी अधिवेशनावरुन भाजपवर आज पुन्हा निशाणा साधला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली. “कोणतंही कारण न देता हिवाळी अधिवेशनाचे जे सत्र नोव्हेंबरमध्ये होतं ते सध्या लांबणीवर टाकलं जात आहे. संसदीय कार्यमंत्र्यांनाही याची माहिती नसेल. कारण, त्यांना यासंदर्भातील सर्व आदेश पीएमओकडून येतात.” असा आरोप करण्यात आला.

संबंधित बातम्या

काँग्रेसने यापूर्वी अनेकदा अधिवेशन लांबणीवर टाकलं, अरुण जेटलींचा पलटवार

जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग अधिवेशन का लांबवलं? : सोनिया गांधी