Yogi Aditynath On Gyanvapi Survey: ज्ञानवापीच्या ASI सर्वेक्षणाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य समोर आले आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, जर ज्ञानवापीला मशीद म्हटले तर त्यावरून वाद होईल. मुस्लिम समूदायाकडून मोठी ऐतिहासिक चूक झाली असून ती सुधारण्यासाठी त्यांच्याकडूनच प्रस्ताव आला पाहिजे असंही ते म्हणाले. वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून 3 ऑगस्टला न्यायालयाचा अंतिम निर्णय येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


ज्ञानवापीच्या प्रश्नावर बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हटले तर वाद होईल. ज्ञानवापीमध्ये आधीपासूनच देवांच्या मूर्ती आहेत, त्या ठिकाणी त्रिशूल आहे. हिंदूंनी या मूर्ती ठेवल्या आहेत का? मशिदीच्या आत त्रिशूल कसं आलं? मला वाटतं ज्याला देवाने दृष्टांत दिला आहे त्याने ते पाहावं. ज्ञानवापीमध्ये ज्योतिर्लिंग आहे, देवांच्या मूर्ती आहेत. राज्य सरकारला आता तोडगा हवाय. 
 
योगी आदित्यनाथ ज्ञानवापीवर बोलताना म्हणाले की, "ज्ञानवापीबाबत मुस्लिम समाजाकडून ऐतिहासिक चूक झाली आहे. ही ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी आणि यावर तोडगा काढण्यासाठी हा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला पाहिजे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया' असे नाव देण्यावरही प्रश्न उपस्थित केला आणि त्याला 'इंडिया' म्हणू नये, तो डॉट डॉट डॉट ग्रुप आहे, असे सांगितले. कपडे बदलून माणसाला पूर्वीच्या कर्मापासून मुक्ती मिळत नाही अशी टीकाही त्यांनी केली. 
 
ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू आहे. हिंदूं पक्षकारांच्या बाजूने हे सर्वेक्षण करावे, अशी मागणी होत होती तर मुस्लिम पक्षकाराकडून याच्या सर्वेक्षणाला विरोध होत होता. याप्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून 3 ऑगस्ट रोजी यावर निकाल येणार आहे. 


Gyanvapi Masjid Case : काय आहे प्रकरण? 


ऑगस्ट 2021 मध्ये पाच महिलांनी श्रृंगार गौरी पूजेसाठी आणि अन्य धार्मिक बाबींसाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर दिवाणी कोर्टाचे न्या. रवी कुमार दिवाकर यांनी कोर्ट कमिश्नर नियुक्त करून ज्ञानव्यापी मशिदीचे  सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हिंदू पक्षकारांनी दावा केली की, या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळून आले. तर, मुस्लिम पक्षकारांनी सांगितले की हा फवारा आहे. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी हा भाग सील करण्याची मागणी केली होती. कोर्टाने हा भाग सील करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 


ही बातमी वाचा: