अँटी रोमियो पथक
प्रचारात भाजपने महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरला होता. त्याचाच भाग म्हणून आदित्यनाथ यांच्या सरकारने पहिल्याच दिवशी अँटी रोमियो पथकाची स्थापना केली. या पथकाने लखनऊमध्ये पहिली कारवाई करत 4 ठिकाणांहून 8 तरुणांना ताब्यात घेतलं.
‘राम म्युझियम’साठी 25 एकर जमीन
योगी आदित्यनाथ यांनी राम म्युझियमसाठी मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र अखिलेश यादव सरकारच्या काळात या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. आता उत्तर प्रदेशच्या नवीन सरकारने या योजनेसाठी 25 एकर जमीन देण्याची तयारी दाखवली आहे. तर केंद्राकडून 154 कोटींचा निधी मिळणार आहे.
धार्मिक स्थळांची सुरक्षा
आगामी, रामनवमी आणि नवरात्र उत्सवासाठी उत्तर प्रदेशातील सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
कायदा आणि सुव्यवस्थेवर भर
भाजपने प्रचारादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवरुन समाजवादी पार्टीवर हल्लाबोल केला होता. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच कायदा आणि सुव्यवस्थेवर भर दिला आहे.
कत्तलखान्यांवर कारवाई
भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरु होईल, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. 15 मार्चपासून आतापर्यंत वाराणासी, गाझियाबाद, अलाहाबादमध्ये अनेक कत्तलखाने बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.