World Population Day: सध्या जगात चीन आणि भारत हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या जगात चीनची लोकसंख्या (China Population) जगात सर्वाधिक आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. मात्र, आता लवकरच भारताची लोकसंख्या ही चीनपेक्षा अधिक होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (UN Report On Population) याबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. येत्या वर्षभरात भारत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने World Population Day च्या निमित्ताने सोमवारी एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, नोव्हेंबर 2022 च्या मध्यापर्यंत जगातील लोकसंख्या आठ अब्ज होण्याचा अंदाज आहे. सर्वाधिक लोकसंख्या ही आशिया खंडात असणार आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 61 टक्के लोकसंख्या आशिया खंडात आहे. आशिया खंडात 4.7 अब्ज लोकसंख्या आहे. त्यानंतर आफ्रिका खंडात 1.3 अब्ज लोकसंख्या वास्तव्य करते. जगातील लोकसंख्येच्या अनुषंगाने हा वाटा 17 टक्के इतका आहे. त्याशिवाय युरोपमध्ये 75 कोटी म्हणजे 10 टक्के लोकसंख्या आहे. तर, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये 65 कोटी लोकसंख्या आहे. तर, उत्तर अमेरिकेत 37 कोटी आणि ओसिनियामध्ये 4.3 कोटी लोक वास्तव्य करत आहेत.
चीनच्या लोकसंख्येत घट
World Population Prospects 2019 नुसार सध्या चीनची लोकसंख्या 1.44 अब्ज आहे. तर, दुसऱ्या स्थानावर भारत असून 1.39 अब्ज लोकसंख्या आहे. जगातील एकूण लोकसंख्येत चीनचा वाटा 19 टक्के आणि भारताचा वाटा 18 टक्के आहे. एका अहवालानुसार, वर्ष 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होणार आहे. चीनच्या लोकसंख्येत वर्ष 2019 ते वर्ष 2050 या कालावधीत 3.14 कोटी म्हणजे 2.2 टक्क्यांनी घट होणार आहे.
UN Department of Economic and Social Affairs च्या अंदाजानुसार, जगातील लोकसंख्या ही 1950 नंतर आतापर्यंतची सर्वात धीम्या गतीने वाढत आहे. या अंदाजानुसार, जगातील लोकसंख्या ही वर्ष 2030 पर्यंत 8.5 अब्ज इतकी होईल. वर्ष 2050 पर्यंत जगातील एकूण लोकसंख्या 9.7 अब्ज इतकी होईल, असा अंदाज आहे. 2080 मध्ये जगाची लोकसंख्या 10.4 अब्ज इतकी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, अनेक विकसनशील देशाच्या जन्मदरात घट झाली आहे. येत्या काही वर्षात आठ देशांची लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. यामध्ये कांगो, इजिप्त, इथियोपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपाइन्स आणि टांझानिया या देशांचा समावेश आहे.