नवी दिल्ली:  राष्ट्रीय महिला आयोगाने भारत महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश आहे हा ‘थॉमसन रायटर्स फाउंडेशन’चा दावा फेटाळला आहे. अवघ्या 548 लोकांच्या सर्व्हेवरुन संपूर्ण देशाचा निष्कर्ष कसा काढला? असा सवाल महिला आयोगाने उपस्थित केला आहे.


या सर्व्हेनुसार महिलांसाठी असुरक्षित असणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात महिलांवर लैंगिक अत्याचार करणं फारच सोपं आहे, हेच महिलांच्या असुरक्षिततेमागचं मुख्य कारण देण्यात आलं आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महिला असुरक्षिततेबाबतीत भारत हा अफगाणिस्तान आणि सौदीपेक्षाही वरच्या क्रमांकावर आहे.

मात्र भारताच्या महिला आयोगाने या सर्व्हेवर आक्षेप घेतला आहे. महिला आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या मते, “थॉमसन रायटर्स फाउंडेशन’ने जो दावा केला आहे, त्याचं प्रमाण, त्याचे नमुने (सॅम्पल साईज) खूपच कमी होते. त्यावरुन संपूर्ण देशाचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ज्या देशात महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचीही परवानगी नाही, त्या देशांचाही नंबर भारतापेक्षा खालचा आहे. त्यामुळे हा सर्व्हे चुकीचा आहे”

अवघ्या 548 जणांचा सर्व्हे
‘थॉमसन रायटर्स फाउंडेशन’ने फोन आणि वैयक्तिकरित्या 26 मार्च ते 4 मे यादरम्यान हा ऑनलाईन 548 लोकांचा सर्व्हे केला.

या सर्व्हेत युरोप, आफ्रिका, अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रांचा समावेश करण्यात आला.

यापूर्वी 2011 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत, महिलांसाठी अफगाणिस्तान सर्वात धोकादायक देश होता. त्यानंतर कांगो, मग पाकिस्तान आणि त्यानंतर चौथ्या स्थानावर भारत होता.

पण ताज्या सर्व्हेत पाकिस्तान सहाव्या स्थानावर तर भारत पहिल्या स्थानावर गेला आहे.
या सर्व्हे एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, भारताने 2012 साली निर्भया प्रकरण होऊनही महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले नाहीत. परिणामी, सात वर्षांपूर्वी चौथ्या स्थानी असलेला भारत आता पहिल्या स्थानी गेला.

अमेरिका तिसऱ्या क्रमांकाचा असुरक्षित देश
भारत या क्रमवारीत पहिल्या स्थानी आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच दुसरी खळबळजनक गोष्ट या सर्व्हेतून समोर आली आहे. महिलांसोबत सर्वाधिक लैंगिक हिंसा होणाऱ्या देशात अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या 

भारत महिलासांठी सर्वात असुरक्षित देश : सर्व्हे