शिमला : अवैध बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक महिला नगरविकास अधिकाऱ्यावर गेस्ट हाऊस मालकिणीच्या मुलाने चक्क गोळी झाडली. यात शैलबाला शर्मा यांचा मृत्यू झाला. तसंच एक पोलीसही गंभीर जखमी झाला आहे. हिमाचल प्रदेशातल्या कसौली इथे ही घटना घडली.

विजयचा कारवाईत अडथळा
शैलबाला शर्मा यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाची टीम मंगळवारी सकाळी 11 वाजता कसौलीच्या नारायण गेस्ट हाऊसचं अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी गेस्ट हाऊसच्या मालकीण नारायण देवी आणि त्यांचा मुलगा विजयला समजावलं. पण काहीही न ऐकता ते कारवाईला विरोध करत होते.

कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी विजयला ताब्यात घेण्यास सांगितलं. त्यावेळी विजयने अधिकाऱ्यांकडे काही वेळ मागितला. यानंतर प्रशासनाची टीम दुसऱ्या ठिकाणी कारवाईसाठी गेली. महत्त्वाचं म्हणजे विजस स्वत: वीज विभागात सरकारी कर्मचारी आहे.

टीम दुसऱ्यांदा आल्याने गोळीबार
मग दुपारी 2.30 च्या सुमारास शैलबाला पुन्हा गेस्ट हाऊसला पोहोचल्या. टीमचे सदस्य गेस्ट हाऊसच्या आत दाखल होताच रिसेप्शनजवळ उभ्या असलेल्या विजयने पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. यानंतर तिथे एकच गोंधळ उडाला.

स्वत:चा बचाव करण्यासाठी शैलबाला मागच्या दिशेने धावल्या. पण त्याचवेळी त्यांना एक गोळी लागली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गोळीबारानंतर अतिक्रमणविरोधी कारवाई रोखण्यात आली.

आरोपीवर एक लाखाचं बक्षीस
दरम्यान या घटनेनंतर आरोपी विजय पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विजयची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, असं कायदा व सुव्यवस्थेचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाची डेडलाईन
हिमाचल प्रदेशातील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचं अवैध बांधकाम तोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. 15 दिवसांच्या आत अवैध बांधकाम हटवा, असं हॉटेल मालकांना सांगण्यात आला होता. डेडलाईन संपल्यानंतर मंगळवारी प्रशासनाच्या चार टीम धर्मपूर-कसौलीत अवैध बांधकाम तोडण्यासाठी दाखल झाल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
अवैध बांधकाम हटवताना झालेल्या गोळीबारात महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने या घटनेवर पोलिसांना फटकार लगावली. दिवसाढवळ्या गोळी झाडून महिला अधिकाऱ्याची कथितरित्या हत्या करण्यात आली, आरोपी पसार झाला आणि पोलिस केवळ पाहत राहिले.