होशियारपूर : पंजाबमधील होशियारपूरमध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. स्थानिक महिला सरपंचावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी कुणालाही अटक केली नाही. गेल्या काही दिवसांपासून गावातील सरपंचाशी पीडित महिलेचा जमिनीवरुन वाद सुरु होता.
पीडित महिलेचं नाव वीणा सून, महिला सरंपाचसह आणखी काही लोकांनी वीणाला मारहाण केल्याचं समजतं आहे.
ज्या जमिनीवरुन वीणा आणि स्थानिक सरपंचामध्ये वाद होता, त्या जमिनीवर वीणा काम करण्यासाठी गेली असताना महिला सरपंचांने आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने वीणाला घेराव घालून बेदम मारहाण केली.
वीणाला मारहाण होत असताना उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या वीणाला स्थानिकांनी हॉस्पिटलमध्ये नेले. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.