नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप चॅट आणि कॉल रेकॉर्ड चेक करण्यासाठी पतीने पत्नीचा मोबाईल हातात घेताच, पत्नीने त्याच्यावर विळ्याने हल्ला केला. या घटनेनंतर पत्नीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पतीच्या नातेवाईकांनी तिला पकडलं. ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.


आग्र्यातील भिलवाली गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या नेत्रपालला (वय 21 वर्ष) उपचारांसाठी एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या डोक्यात टाके पडले आहेत.

नेत्रपाल आणि नीतू सिंह (वय 19 वर्ष) यांचा विवाह 2014 मध्ये झाला होता. पण काही काळापासून ते दोघे वेगळे राहत होते. नीतूचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचं म्हटलं जात आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी नीतू नेत्रपालच्या घरी आली होती.

नेत्रपालने त्याच्या जबाबात म्हटलं आहे की, "शनिवारी मी माझ्या पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करताना पाहिलं. यानंतर मी तिच्या फोन मागितला असता, तिने नकार दिला आणि माझ्यापासून दूर राहा असंही म्हणाली. मग मी चॅट डिटेल्स पाहण्यासाठी जबरदस्तीने तिचा फोन घेतला तर तिने माझ्यावर विळ्याने हल्ला केला आणि मी बेशुद्ध झालो."

तर नेत्रपालचे वडील राजीव सिंह म्हणाले की, "नीतूचा दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंध आहेत आणि लग्नाच्यावेळी आमच्यापासून हे लपवून ठेवलं होतं. यानंतर आम्ही नीतूला प्रॅक्टिकली विचार करुन नेत्रपालसोबत आयुष्य काढण्यास सांगितलं. पण तिने आमचं ऐकलं नाही आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत संपर्क सुरुच ठेवला."

या घटनेनंतर नीतूने आपल्या कथित बॉयफ्रेण्डसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण नेत्रपालच्या नातेवाईकांनी तिला पकडलं आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

याबाबत नीतूला विचारलं असता ती म्हणाली की, तिच्या पतीने तिला अडकवण्यासाठी स्वत:वर विळ्याने हल्ला केला. दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आम्ही महिलेला ताब्यात घेतलं असून, पीडित कुटुंबीयांच्या लेखी तक्राराची प्रतीक्षा करत आहोत.