नवी दिल्ली : 'देशाच्या विकासासाठी आणखी मोठे निर्णय घेणार, आज देशात मंदीचा लवलेशही नाही. संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही.' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. दिल्लीतील विज्ञान भवनमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.


अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रत्येक मुद्द्याबाबत मोदींनी आकडेवारी सादर करत उत्तर दिलं. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी मागील यूपीए सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.

8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन असल्याचं सांगत मोदींनी सुरुवातीलाच नोटाबंदीचंही समर्थन केलं आहे.

‘देशाची अर्थव्यवस्था भक्कम’

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या काळात विकासदर तब्बल 5 वेळा घसरला होता. मात्र, आता देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे.'

‘मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नव्हता‘

‘मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नव्हता. सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावाही आम्ही कधीच करत नाही.’ असं म्हणत मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं. तसंच जीएसटीबाबत बोलताना मोदींनी स्पष्ट केलं की, ‘GSTच्या काही नियमाचा व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. पण लवकरच या नियमांमध्ये बदल केले जातील.’

‘देशातील जनतेचं राहणीमान उंचावलं’

देशात कार, कमर्शिअल गाड्या खरेदी, विमानप्रवास यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं सांगत मोदींनी देशातील जनतेचं राहणीमान उंचावल्याचं यावेळी सांगितलं.

‘देशाच्या विकासासाठी आणखी मोठे निर्णय घेऊ’

‘देशाच्या विकासासाठी आम्ही आणखी मोठे निर्णय घेणार आहोत. माझ्या वर्तमानकाळासाठी मी देशाचं भविष्याची मी आहुती देऊ शकत नाही.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयांवर देशभरातून सध्या टीका सुरु आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आजच्या भाषणातून मोदींनी या सर्व टीकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन : मोदी

काँग्रेसच्या काळात विकासदर घसरला नाही का? : मोदी

देशात परदेशी गुंतवणुकीचा विक्रम : मोदी

मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नाही : मोदी

देशातील बदलत्या अर्थव्यवस्थेत इमानदारांना सुरक्षा मिळेल : मोदी

देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी : मोदी

सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावा आम्ही कधीच करत नाही : मोदी

जून महिन्यानंतर गाड्यांच्या विक्रीमध्ये 23 टक्के वाढ झाली आहे : मोदी

विकासासाठी मोठे निर्णय घेणार आहोत : मोदी

2100 किमीपेक्षा जास्त किमीचे रेल्वेमार्ग बनवले : मोदी

जास्तीत जास्त परदेशी चलन भारतात यावं यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे : मोदी

सरकारच्या निती आणि नियत यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे : मोदी

तवणूकदारांचा सरकारच्या नैतिकतेवर विश्वास : मोदी

संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही : मोदी