लखनऊ : उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात आम्ही झिरो टॉलरन्सचं धोरण अवलंबलं असून, कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयच्या पथकाने अटक केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी संवाद साधला.


“उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण नऊ तारखेला समोर आले. त्यानंतर तातडीने एसआयटी स्थापन करुन, कारवाईस सुरुवात केली. एसआयटीच्या अहवालानुसार, जे पोलिस कर्मचारी आणि डॉक्टर दोषी आढळले, त्यांचे निलंबन करण्यात आले आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.”, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.

तसेच, “गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये आम्ही झिरो टॉलरन्सचे धोरण अवलंबत आहोत. आमचं सरकार अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड करणार नाही. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल”, असे आश्वासनही योगी आदित्यनाथ यांनी दिले.

भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी असलेला भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयच्या पथकाने अटक केली आहे. लखनौच्या इंदिरा नगर भागातील राहत्या घरातून नाट्यमय पद्धतीने सेंगरच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटकेनंतरही सेंगरची दबंगगिरी सुरुच असल्याचं पाहायला मिळालं.

कुलदीप सिंह सेंगर विरोधात रविवारी रात्री अडीच वाजता एफआयआर दाखल करण्यात आला होता. पॉक्सो कायद्याअंतर्गतही त्याच्याविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी सीबीआयच्या लखनौतील मुख्यालयात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपचे उन्नावमधील आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्यांच्या भावाने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

खटला मागे न घेतल्यामुळे 3 एप्रिल रोजी आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेले वडील सुरेंद्र सिंह यांच्यावरच गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यांना तुरुंगात पाठवलं. मात्र जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र सिंह यांना मृत घोषित करण्यात आलं.

आमदाराच्या भावाने केलेल्या मारहाणीत सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. आमदाराच्या दबावामुळे वर्षभरापासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

न्याय न मिळाल्यामुळे रविवारी पीडितेचं कुटुंब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहन करण्यासाठी गेलं होतं. त्यानंतर बलात्कार पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

संबंधित बातमी : उन्नाव गँगरेप प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला अटक