नवी दिल्ली : उन्नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मध्यरात्री दिल्लीतील इंडिया गेटसमोर निदर्शनं केली.

काँग्रेस मुख्यालयापासून इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च काढून राहुल गांधी यांनी बलात्काराच्या घटनांचा निषेध नोंदवला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी हजारोंच्या संख्येत नागरिकही राहुल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले होते.

नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयापासून 12 वाजता सुरु झालेल्या या मोर्चाचे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास समारोप झाला.

संबंधित बातमी : काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’चा नारा देत बोलघेवडेपणा करणाऱ्या सरकारने महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते या मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते.


उन्नावमध्ये 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप भाजप आमदार कुलदिप सिंह सेंगर यांच्यावर आहे, तर दुसरीकडे काश्मीरमधील कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही प्रकरणाती तपासात सरकार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

दुसरीकडे, बॉलिवूड, क्रिकेट स्टार्स, सोशल पर्सनॅलिटीज आणि हायप्रोफाईल उद्योजकांनीही चिमुकलीरील भीषण अन्यायावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे जम्मू आणि उन्नाव प्रकरणामुळे भाजपची पुरती बेअब्रू झाली आहे. उन्नावमध्ये तर भाजप आमदारावर एफआयआर दाखल करण्यासाठी चक्क हायकोर्टाला आदेश द्यावा लागल्यानं योगी सरकारची प्रतिमाही पुरती मलीन झाली आहे.

17 एप्रिल काळा दिवस पाळणार

उन्नाव आणि कठुआच्या घटनेविरोधात महिला काँग्रेस गुरुवारी उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निदर्शन करणार आहे. तर काँग्रेसतर्फे देशभरात 17 एप्रिलला ‘काळा दिवस’ पाळण्याची घोषणा केली आहे.