नवी दिल्ली: 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत असताना, विरोधकांनी नव्यानं येणाऱ्या 2000च्या नोटांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 500, आणि 1000च्या नोटा रद्द करून काळा पैसा बाहेर आणण्याची मोदी सरकारची योजना आहे. मात्र 2000च्या नोटा चलनात आणून मोदी सरकारला काय हाशील करायचं आहे? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.


भविष्यात जमा होणारी काळी माया 2000च्या नोटांच्या रुपात का दडवली जाऊ शकत नाही? असा प्रश्न माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्यानंतर देशभरात याबाबतच चर्चा सुरु आहे.

10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना पाचशे-हजारच्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले होते.