नवी दिल्ली : पानिपत... मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलं गेलेलं हे नाव सध्या देशाच्या राजकारणात चर्चिलं जातंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झालाय आणि गेल्या काही दिवसांपासून भाजप कार्यकर्त्यांच्या प्रत्येक व्यासपीठावर अमित शाह वारंवार या निवडणुकीची तुलना पानिपतच्या तिसऱ्या लढाईशी करत आहेत. नुकतंच भाजपचं जे राष्ट्रीय अधिवेशन झालं, त्यातही त्यांना पुन्हा मराठ्यांचं पानिपत आठवलं.


कुठलंही मिशन फत्ते करायचं असेल, तर आपल्या टीमला सतत प्रोत्साहन देण्याची गरज असते. इंग्लिशमध्ये ज्याला war cry किंवा मराठीत युद्धघोष म्हणतात, तसाच युद्धघोष पानिपतच्या निमित्ताने अमित शाह भाजपच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना देऊ पाहत आहेत. पण भारताच्या इतिहासात अनेक लढाया लढल्या गेल्या. अगदी पानिपतच्याही तीन लढाया प्रसिद्ध आहेत. मग त्यात नेमकी ही तिसरीच लढाई अमित शाहांना का बरं आठवत असेल? हे समजून घेण्याआधी या लढाईचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यायला हवं.

पानिपतची तिसरी लढाई 14 जानेवारी 1761 ला मराठे आणि अहमदशाह अब्दालीमध्ये झाली. या लढाईने देशाच्या इतिहासावर जे महत्त्वाचे परिणाम केले ते पुढीलप्रमाणे

1. पानिपतच्या लढाईआधी ज्या मराठयांचा साम्राज्यविस्तार अटकेपर्यंत झाला होता, त्या मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली.

2. दिल्लीची गादी सांभाळण्याचं काम जे मराठा करत होते, त्यांचाच असा मोठा पराभव झाल्यानं इंग्रजांना भारतात पाय रोवायला मोकळं रान मिळालं.

3. देश पुढे 200 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला. या लढाईचा निकाल मराठ्यांच्या बाजूनं लागला असता, तर इंग्रज इतक्या सहजासहजी भारतात राज्य करु शकले असते का, याबद्दल अनेक इतिहासकार शंका व्यक्त करतात.

पानिपतच्या या तिसऱ्या लढाईचे परिणाम काय झाले, हे पाहिल्यावर अमित शाहा नेमकं काय सांगू पाहतायत हे तुमच्या लक्षात आलं असेल.

मराठीमध्ये पानिपत हा शब्द नकारार्थी भावनेनेच वापरला जातो. पानिपतच्या या लढाईनं जे देशाचं नुकसान केलं तेच नुकसान 2019 ला भाजपच्या पराभवानं होईल असं अमित शाह सांगू पाहत आहेत. म्हणजे एका अर्थानं ते मतदारांना इमोशनल ब्लॅकमेलिंग करत आहेत किंवा वाईट परिणामांची भीती दाखवत आहेत.

पानिपतआधी मराठ्यांच्या 131 विजयांचं उदाहरण देत असताना त्यांना 2014 नंतर भाजपनं देशभरात एकापाठोपाठ एक राज्यं जिंकण्याचा जो सपाटा लावला तोही आठवत असावा. पानिपतच्या या एका लढाईनं मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली तशी 2019 च्या एका पराभवानं मोदींच्या नेतृत्वाला लागू शकते असं त्यांना म्हणायचंय का?

मराठ्यांचं पानिपत झाल्यामुळे इंग्रजांच्या गुलामगिरीत 200 वर्षे काढावी लागली याचा अर्थ काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या हातात सत्ता म्हणजे देशाची गुलामगिरी आहे असा होतो का? असे अनेक प्रश्न या तुलनेनं उपस्थित होत आहेत. अर्थातच घोडामैदान लांब नाही. त्यामुळे 2019 ला कुणाचं पानिपत होणार हे लवकरच कळेल.