नवी दिल्ली/मुंबई : प्रद्युम्न ठाकूर या 7 वर्षांच्या मुलाच्या हत्येनंतर रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजमेंटवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हायफाय इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईसह देशभरात अत्यंत वेगाने या शाळेने आपलं जाळं पसरवलं आहे. ऑगस्टिन पिंटो नावाच्या एका सामान्य कर्मचाऱ्याने देशातली नामांकित स्कूल चेन स्थापन करण्यात कसं यश मिळवलं याची कहाणी थक्क करणारी आहे.


1976 मध्ये अवघ्या एका शाळेपासून सुरु झालेलं रायन स्कूल आज देशातच नव्हे तर विदेशातही पसरलं आहे. आज देशात 130 पेक्षा अधिक रायनच्या शाळा चालतात. 18 हजार शिक्षक, 2 लाख 70 हजार विद्यार्थी इतका मोठा पसारा एकट्या रायनचा आहे. पण हे सगळं साम्राज्य नेमकं उभं कसं राहिलं? कोण आहेत हे पिंटो जे कर्नाटकातून मुंबईत आले आणि नंतर त्यांनी दिल्लीही काबीज केली?



ऑगस्टिन एफ पिंटो हे मूळचे कर्नाटकच्या मंगळूरमधले. इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतल्यानंतर ते 1970 मध्ये नोकरी शोधण्यासाठी ते मुंबईत आले. भारत स्विस प्लॅस्टिक नावाच्या कंपनीत त्यांची क्लार्क म्हणून नेमणूक झाली. पण अवघ्या दोनच वर्षात कंपनी बंद पडली आणि त्यांची नोकरी गेली. एका मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी मालाडमधल्या एका प्राथमिक शाळेत नोकरी स्वीकारली आणि तिथून त्यांची शिक्षणक्षेत्राशी पहिली नाळ जोडली गेली. शिक्षकाची नोकरी करत असतानाच ते ग्रेस अल्बकुर्क या गणित शिक्षिकेच्या प्रेमात पडले, 1974 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांच्या समोर एकच समान ध्येय होतं. देशात इंग्रजी शिक्षणासाठी जी शाळांची पोकळी आहे ती भरुन काढण्याचं.

अवघ्या 10 हजार रुपयांत त्यांनी पहिली शाळा मुंबईच्या बोरीवलीमध्ये सुरु केली. पण हे पहिलं जॉईंट व्हेंचर काही फार यशस्वी झालं नाही, त्यांना स्कूल बंद करण्याची वेळ आली. पण 1983 मध्ये त्यांनी सेंट झेवियर्स स्कूल नावाने पुन्हा एक शाळा उघडली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही.

ग्रेस अल्बकुर्क आता मॅडम पिंटोंच्या नावाने ओळखल्या जातात. ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्या काम करतात. अतिशय कॉर्पोरट स्टाईलने या शाळेचं व्यवस्थापन काम करतं. पिंटोंचे देशातल्या सर्वपक्षीय बड्या नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. शाळेसाठी काही काम निघालं की ते करुन घेण्यासाठी हे नेटवर्क त्या हुशारीने वापरायच्या. शिवाय नेत्यांना आपल्या मतदारसंघात असं नामांकित इंग्लिश स्कूल आणलं की फायदा व्हायचाच. त्यामुळे फायद्यासाठी दोघेही एकमेकांवर अवलंबून, 2014 च्या आसपास देशात मोदी लाट दिसू लागल्यावर रायन व्यवस्थापनाने त्याची पावलं वेळीच ओळखली.



याच रायन इंटरनॅशनल स्कूलबद्दल 2015 मध्ये एक मोठा वाद झाला होता. कारण पिंटो आणि कंपनीने शाळेतल्या कर्मचाऱ्याना सक्तीने भाजप सदस्य करुन घेण्याचं अभियान सुरु केलं होतं. शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी या सगळ्यांनाच बळजबरीने भाजप सदस्य करायचा धडाका सुरु होता. मीडियामध्ये याच्या बातम्या आल्यानंतर हा प्रकार थंडावला. पण त्यामुळे पिंटो यांच्या भाजप कनेक्शनची जोरदार चर्चा झाली. ग्रेस पिंटो यांना या अभियानाच्या बदल्यात राज्यसभा खासदारकी मिळणार होती अशीही कुजबूज तेव्हा सुरु झाली होती.

केवळ मुंबई, दिल्लीतच नव्हे तर आता विदेशातही रायनच्या शाळा आहेत. ऑगस्टिन आणि ग्रेस पिंटो यांचा मुलगा रायन याने लंडनच्या बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. इंग्रजी शिक्षणासंदर्भातली पोकळी लक्षात घेऊन एक उत्तम बिझनेस मॉडेल या कुटुंबाने महाराष्ट्राला आणि सगळ्या देशाला विकलं. इंग्लिशच्या नावाखाली जनता त्यांच्या मागे पळत राहिली. स्पर्धाही इतकी वाढली होती की त्याबदल्यात आपल्या मुलांना आवश्यक असलेल्या बेसिक गोष्टी तरी शाळा पुरवतेय का याचा विचार करायला कुणाला भानच उरलेलं नव्हतं.

संबंधित बातम्या

प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस

लैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस कंडक्टर अटकेत