कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहु गांधी यांनी बर्कलेच्या प्रतिष्ठीत कॅलिफोर्निया विद्यापीठात दिलेल्या भाषणादरम्यान एकीकडे पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली तर दुसरीकडे त्यांच्यावर निशाणाही साधला.


मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ता
"पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा चांगले वक्ता आहेत, पण त्यांनी काश्मीरमध्ये दहशतवादासाठी मार्ग सुरु केले आहेत. नरेंद्र मोदी माझेही पंतप्रधान आहेत, त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत. ते शानदार वक्ते आहेत. त्यांची संवादशैली माझ्यापेक्षा उत्तम आहे. गर्दीत तीन-चार समुहांना काय संदेश द्यायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. एखादा संदेश देण्याची त्यांची क्षमता अतिशय प्रभावी आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

कश्मीरमध्ये दहशतवाद वाढला
कश्मीरमधील परिस्थितीबाबत राहुल गांधी म्हणाले की, "मी पडद्यामागे सातत्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, पी चिंदबरम, जयराम रमेश आणि इतरांसह 9 वर्षांपर्यंत दहशतवादाला नष्ट करण्यासाठी काम केलं आहे. आम्ही सुरुवात केली, तेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद वाढलेला होता, पण 2013 पर्यंत आम्ही दहशतवादाचं कंबरडं मोडलं होतं. यानंतर मी मनमोहन सिंह यांना मिठी मारुन हे आपल्या सर्वात मोठ्या यशापैकी एक असल्याचं म्हटलं होतं."

माझ्याविरोधात भाजपची टीम
"भाजपने माझ्याविरोधात टीम ठेवली आहे. एक हजार लोकांची ही टीम असून ते कम्प्युटरवर बसून माझ्याविरोधात लिहित असतात. ते माझ्याविरोधात द्वेष पसरवतात. जी व्यक्ती हा देश चालवतोय तीच व्यक्ती माझ्याविरोधातील ऑपरेशन चालवते," असा दावा राहुल गांधींनी केला आहे.

संपूर्ण देशात घराणेशाही
घराणेशाहीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, बहुतांश देश यावरच चालतात, फक्त माझ्याबद्दल बोलू नका. अखिलेश यादव, स्टॅलिन, धूमलची मुलंही माझ्याप्रमाणेच संबंधित घराण्यातील आहेत. मुकेश अंबानी, अभिषेक बच्चनही वंशज आहेत आणि अशाप्रकारेच संपूर्ण देश चालत आहे.

अहंकारामुळे काँग्रेसचा पराभव
2012 च्या जवळपास काँग्रेसमध्ये अहंकार भरला होता, ज्यामुळे फार मोठं नुकसान झालं होतं. यानंतर आता पक्षाला पुनर्निमाणाची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी चूक केल्याचं राहुल गांधींनी मान्य केलं. 2012 च्या सुमारास काँग्रेस नेत्यांमध्ये उद्धटपणा आला होता आणि त्यांनी संवाद साधणंच बंद केलं. याचा विपरित परिणाम निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेल्या दारुण पराभवातून दिसून आला.

भाजप सध्या जे काही करत आहे ते सगळं आम्ही आधीच केलं आहे, उदाहरणार्थ मनरेगा आणि जीएसटी, असंही राहुल गांधी म्हणाले.

हिंसेने माझी आजी, वडील हिरावले
शिखांसोबत झालेल्या हिंसेबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, "आजीचं शिखांवर प्रेम होतं आणि एकेकाळी त्यांच्या घरात अनेक शीख होते. हिंसेने माझी आजी हिरावली, माझे बाबा हिरावले, त्यामुळे हिंसेचं दु:ख काय असतं, याची मला चांगलीच माहिती आहे. लोकांना न्याया मिळवून देण्यासाठी आणि हिंसेविरोधात कायम उभं राहिन."

पाहा व्हिडीओ