नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) नेमके कुठे आहेत, त्यांचा पत्ता काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. विरोधी पक्षांनी तर धनखड यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांच्याबद्दल सरकारने माहिती जाहीर करावी अशी मागणी केली. त्यानंतर आता जगदीप धनखड यांच्याबद्दल माहिती समोर आली आहे. जगदीप धनखड हे अजूनही उपराष्ट्रपती निवासस्थानातच राहत असल्याची माहिती आहे.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी आरोग्याच्या कारणास्तव अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा (Jagdeep Dhankhar Resignation) सादर केला. त्यानंतर पुढच्या काही दिवसात त्यांच्या प्रशासकीय आणि राजकीय स्थितीविषयी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
लवकरच नव्या निवासस्थानी स्थलांतर करणार
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे सध्या दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासस्थानामध्येच राहत असून लवकरच ते नवीन निवासस्थानी राहायला जाणार आहेत. त्यांच्या शिफ्टिंगची तयारी (relocation process) सुरू झाली असून, त्यांनी Type VIII च्या सरकारी बंगल्यामध्ये स्थलांतर करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जगदीप धनखड ज्या निवासस्थानी राहायला जाणार आहेत ते Lutyens' Delhi मधील महत्त्वाचे निवासस्थान आहे.
विरोधी पक्षांची सरकारवर टीका
राजीनाम्यानंतर धनखड यांच्या संपर्काचा कोणताही प्रशासकीय किंवा सार्वजनिक ठावठिकाणा उपलब्ध नसल्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरुन सरकारला धारेवर धरलं होतं. राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटाचा संदर्भ दिला आणि जगदीप धनखड यांचा उल्लेख हा लापता उपराष्ट्रपती असा केला.
त्याचबरोबर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीदेखील गृहमंत्र्यांना पत्र लिहून धनखड यांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षिततेबाबत (health & safety) माहिती देण्याची मागणी केली होती. सरकारने जगदीप धनखड यांच्याबद्दल माहिती दिली नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा पवित्रा राऊत यांनी घेतला होता.
Vice Presidential Election Date: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल. उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.
ही बातमी वाचा: