दावोस : जागतिक आर्थिक फोरम परिषद (डब्ल्यूईएफ) ची बैठक 22 जानेवारीपासून स्वित्झर्लंडमध्ये सुरु होत आहे. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभाग घेतील. 23 जानेवारीला मोदी या परिषदेला संबोधित करतील. मोदी 21 वर्षांनी दावोसला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1997 साली तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी दावोसमध्ये सहभाग घेतला होता. दावोस परिषद काय आहे? यामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होते आणि कोणत्या अनुषंगाने ही परिषद महत्त्वाची आहे? या परिषदेमध्ये असं काय आहे, ज्यामुळे मोठ्या नेत्यांसोबतच जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यामध्ये सहभागी होतात? आणि दावोस परिषद भारतासाठी का महत्त्वाची आहे? दावोस परिषद काय आहे? दावोस हे स्वित्झर्लंडमधील सुंदर शहर आहे, जे लँड वासर नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे शहर स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बूला या पर्वतरागांनी वेढलेलं आहे. या शहराची लोकसंख्या केवळ अकरा हजार आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे शहर आहे. दावोसमध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरम परिषदेची बैठक होते. ज्यामध्ये जगभरातील मोठे नेते आणि उद्योगपतींची उपस्थिती असते. विशेष म्हणजे या बैठकीत सहभाग घेणाऱ्या व्यक्तींना ‘दावोस’ म्हटलं जातं. ज्यांना डब्ल्यूईएफकडून निमंत्रण देण्यात आलेलं आहे, त्यांना यामध्ये सहभाग घेता येतो. या बैठकीत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात. दावोस परिषदेला एक एलीट क्लास परिषद म्हणून पाहिलं जातं. दावोसमध्ये सरकारी आणि खाजगी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन जागतिक विकासासाठी निर्णय घेतात. वर्षाच्या अखेर इथे स्पेंगलर कप आईस हॉकी टूर्नामेंटचंही आयोजन करण्यात येतं. जागतिक आर्थिक फोरम परिषद ही एक खाजगी संस्था आहे, जिची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. स्विस अधिकाऱ्यांकडून या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेचं ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणत जागतिक क्षेत्रिय आणि औद्योगिक विकासाला चालना देणं आहे. पाच दिवस चालणाऱ्या या 48 व्या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सहभाग घेतात. भारताकडून पंतप्रधान मोदींसह 130 जण सहभागी होत आहेत. या परिषदेत या वर्षाची थीम 'क्रिएटिंग अ शेयर्ड फ्यूचर इन अ फ्रॅक्चर्ड वर्ल्ड' अशी आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री कॅट ब्लेन्चेट आणि संगीतकार अॅल्टन जॉन यांचाही सन्मान केला जाणार आहे. यावेळी बैठकीत भारतीय खाद्यपदार्थांची मेजवाणी आणि योगासनांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे. दावोसमध्ये 20 भारतीय कंपन्याही सहभागी होतील.