नवी दिल्ली : नोटाबंदीला 49 दिवस उलटल्यानंतरही देशभरातील लोकांचे दैनंदिन व्यवहार अजूनही सुरळीत झालेले नाहीत. ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी नोटाबंदीमुळे त्रास सहन करावा लागतो आहे. शहरात बंद एटीएम मशिन्समुळेही ग्रामीण भागापेक्षा वेगळी स्थिती नाही.


बँकांमध्ये आठवड्याला 24 हजार आणि एटीएममधून दिवसाला फक्त अडीच हजार रुपयेच काढण्याची मुभा आहे. त्यामुळे लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

शहरी भागात पेटीएम आणि इतर मोबाईल अॅपमुळं काही ठिकाणी व्यवहार थोडा सोपा झाला आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही स्थिती जैसे थे व्हायला वेळ लागण्याची चिन्हं आहेत. कारण स्वाईप मशिनचा तुटवडा, लोकांना ऑनलाईन व्यवहारांची नसलेली सवय आणि माहिती यामुळे ग्रामीण भागात लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीही दिसून येते.

काळा पैसा आणि बनावट नोटांचं रॅकेट यांविरुद्ध लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, जुन्या नोटा बदलण्यासाठी, बँकेत जमा करण्यासाठी आणि बँक, एटीएममधून पैसे काढण्यासाठी आरबीआयकडून वेगवेगळे नियम लावण्यात आले. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे.

पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या 50 दिवसानंतर सर्वकाही आलबेल होईल, असा दावा केला खरा, मात्र आज 49 वा दिवस उजाडल्यानंतरची परिस्थिती पाहिल्यानंतर मोदींच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित राहतो आहे. लोकांचे दैनंदिन व्यवहारही अजून सुरळीत झाल्याचे दिसून येत नाही.