West Bengal Election 2021 Voting पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांत शनिवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. एकू्ण 77 जागांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्तात ही मतदानाची प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये आसाममध्ये 47 आणि पश्चिम बंगालमध्ये 30 जागांसाठी मतदान झालं. 


2021 विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत प. बंगालमध्ये 70.53 टक्के आणि आसाममध्ये 64.88 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळं मतदारांचा चांगला उत्साह या भागांमध्ये पाहायला मिळाला.  


पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पार पडली. यातील अनेक जागा या पूर्वीच्या नक्षलग्रस्त असलेल्या जंगमहल प्रदेशातील आहेत. त्यामुळे या भागात सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती. या भागातील मतदानावर अनेक पक्षांचे तसेच निवडणूक आयोगाचे लक्ष असेल. भाजपला या परिसरातून चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. 2019 साली झालेल्या या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळालं होते. 


WB Election : महाराष्ट्राप्रमाणे पश्चिमबंगालमध्येही आयपीएस अधिकाऱ्यांची चर्चा!


दरम्यान, आसाम आणि बंगालमध्ये तीन टप्प्यामध्ये आठ सत्रांतील निवडणूक पार पडणार आहे. सदर निवडणुकीसाठीची मतमोजणी 2 मे रोजी पार पडणार आहे. आजच्या दिवशी पार पडलेल्या मतदानात बंगालमध्ये 294 जागांपैकी 30 जागांसाठीचं मतदान पार पडलं. यासाठी 191 उमेदवार रिंगणात उतरले होते.


पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींकडे साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे. निव़डणुकीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा टीएमसीचे सरकार स्थापना होऊ शकते. मात्र, मागील विधानसभेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी होताना दिसू शकतात. सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजप काहीसा कालावधी जाऊ शकतो पण, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जागा मात्र वाढलेल्या असतील.