Weather Updates: या महिन्याच्या सुरुवातीला देशातील काही राज्यात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) चांगलीच हजेरी लावली. त्यामुळं थंडी जाणवत होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसात देशातील अनेक राज्यात तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच वाढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसात तापमानात तीन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही राज्यात पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज
आज (१२ मे) राष्ट्रीय राजधानीसह अनेक राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. राजस्थानमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 13 मे ते 15 मे पर्यंत अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळं तापमानात कोणतीही घट होणार नाही. दिल्लीत आज कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय आज राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आणि वादळाची शक्यता आहे. यादरम्यान, जैसलमेर, बिकानेर आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते.
महाराष्ट्रातही तापमानात वाढ होण्याची शक्यता
उत्तर प्रदेशातही सध्या तापमानाचा पारा वाढला आहे. तिथे उष्ण वारे वाहत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या अनेक भागात कमाल तापमान 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागात तापमान 40 अंशांच्या आसपास राहिले. IMD ने गुरुवारी मुंबई आणि ठाण्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला होता. तसेच तापमानात पूर्वीच्या तुलनेत सुमारे तीन अंशांनी वाढ झाली आहे. ओडिशातही उष्णतेची तीव्र लाट सुरू झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे.
चक्रीवादळामुळे त्रिपुरा आणि मिझोराममध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोखा चक्रीवादळ आज तीव्र होणार आहे. मच्छीमार, जहाजे, बोटींनी रविवारपर्यंत बंगालच्या उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्रात न जाण्याचा सल्ला विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे त्रिपुरा आणि मिझोराममध्ये शनिवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय रविवारी नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: