Weather updates : देशातील विविध राज्यात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ या राज्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गुजरातमध्ये 7 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तराखडंमध्ये मुसळधार पाऊस
सध्या उत्तराखडंमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळं मसुरीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. मसुरी-डेहराडून राष्ट्रीय महामार्गाच्या 707A वर, जेपी बँडजवळ दरड कोसळल्यानं रस्ता बराच काळ ठप्प झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशात यंदा मान्सूनने कहर केला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील हरोली येथे एवढा पाऊस पडला की पाण्याच्या जोरदार प्रवाहाने एक स्कॉर्पिओ कार वाहून गेल्याची घटना घडली.
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा यलो अलर्ट
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या आठवड्यातही राज्याच्या विविध भागात पाऊस झाला. दुसरीकडे, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. IMD ने आज 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. 38 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra rain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, बळीराजा आनंदी; शेती कामांना येणार वेग