Weather Update Today : देशात आता थंडीचा कडाका (Cold Weather) वाढताना दिसत आहे. आज मंगळवारपासून देशभरात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), मध्य प्रदेशसह (Madhya Pradesh) महाराष्ट्रात (Maharashtra) गारठा (Cold Wave) वाढला आहे. तर काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या महितीनुसार, 26 डिसेंबर ते 27 डिसेंबरदरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे, राजस्थानमध्ये काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम  महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. 


पूरग्रस्त तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाची शक्यता


जम्मू-काश्मीरसह डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. एकीकडे पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरु असताना थंड वाऱ्यांमुळे मैदानी भागात हुडहुडी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये किनारपट्टी भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यासह देशाच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. 


'या' भागात पावसाची शक्यता


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ईशान्येकडील जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच 27 आणि 28 डिसेंबरला तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


 


दरम्यान, रविवारी पश्चिम, उत्तर आणि पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्ये दाट ते दाट धुके दिसून आलं. येत्या दोन-तीन दिवसांत राजस्थानच्या उत्तर आणि पूर्व भागात विविध ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 डिसेंबरपासून आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.