Coronavirus In India :  कोरोना व्हायरसने (Coronavirus) पु्न्हा एकदा चिंता वाढवली आहे. या वेळेस कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने चिंतेत भर पाडली आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या बाधितांची (Covid 19 JN.1 Cases) संख्या वाढू लागली आहे. सोमवारी, कर्नाटकात 34  JN.1 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, तिघांचा मृत्यू झाला. तर, दुसरीकडे केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसात कोरोनाचे 115 नवीन बाधित आढळले आहेत. 


कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात JN.1 व्हेरिएंटची एकूण 34 प्रकरणे आढळून आली आहेत. यापैकी 20 प्रकरणे बेंगळुरूमध्ये, म्हैसूरमध्ये चार प्रकरणे, मंड्यामध्ये तीन प्रकरणे आणि रामनगरा, बेंगळुरू ग्रामीण, कोडागु आणि चामराजा नगारा येथे प्रत्येकी एक कोरोना बाधित नोंदवण्यात आला आहे. नवीन JN.1 व्हेरिएंटबाधित तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


केरळमध्ये एकाच दिवशी 115 बाधित


गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 115 नवीन प्रकार आढळून आले आहेत. यासह राज्यातील कोविडच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,749 वर पोहोचली आहे. मात्र, राज्यात गेल्या 24 तासांत या विषाणूमुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.


महाराष्ट्रात JN.1 चे 10 रुग्ण


सोमवार 25 डिसेंबर रोजी राज्यात 28 नव्या रुग्णांचं निदान झालं. तसेच आतापर्यंत राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आलेत. त्याचप्रमाणे आज 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर हा 1.81 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात एकूण 134 सक्रिय रुग्ण असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. JN.1 या कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 प्रकाराबाबत सरकारने धोक्याचा इशारा दिलाय. 


JN.1 व्हेरिएंट काय आहे?


JN.1 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑगस्टमध्ये आढळून आला. हा ओमायक्रॉनचा उप-प्रकार BA.2.86 ने तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला  BA.2.86 व्हेरिएंट कोरोनाबाधितांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरला होता.  BA.2.86 व्यापकपणे फैलावला नव्हता. मात्र, तज्ज्ञांनी या व्हेरिएंटवर चिंता व्यक्त केली होती.  BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनवर अतिरिक्त म्युटेशन झाले होते. त्याच प्रकारे JN.1 स्पाइक प्रोटीनवरही एक अतिरिक्त म्युटेशन आहे. 


जागतिक स्तरावर केसेसमध्ये झालेली वाढ हे सूचित करते की JN.1 – Omicron चे उप-प्रकार – मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांना देखील सहजपणे संक्रमित करू शकते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएस मध्ये सर्वात वेगाने फैलावणारा व्हेरिएंट म्हटले आहे.