Weather Update Today : आज देशात काही भागात पाऊस (Rain) तर काही ठिकाणी बर्फवृष्टी (Snowfall) पाहायला मिळेल. भारतीय हवामान खात्याने (IMD) ताज्या हवामान अंदाजात म्हटलं आहे की, आज पंजाब, हरियाणा-चंडीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी, वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह आसपासच्या परिसरातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेशात गडगडाटी वादळी वारा आणि हिमवृष्टी होण्याचीही दाट शक्यता आहे.


पुन्हा एकदा थंडी वाढणार


उत्तर भारतात पावसानंतर पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज, 5 फेब्रुवारीला अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर-पश्चिम भारतातील डोंगराळ भागात पुढील दोन दिवस बर्फवृष्टी आणि पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये आज पावसासोबतच गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे.


पावसानंतर थंडी वाढणार


देशात विविध ठिकाणी शनिवारी आणि रविवारी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे थंडीत काहीशी घट झाली होती. पण, आजपासून पुन्हा तापमानात घट होण्याचा अंगाज आयएमडीने वर्तवला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागात पुढील पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज ओडिशा, आसाम आणि मेघालयमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या विविध भागात रविवारी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला पंजाब, हरियाणा दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आज पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीसह गारपीट होण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Vidarbha Weather Update : हिवाळा संपण्यापूर्वीच विदर्भात उष्णतेच्या झळा? वाचा हवामान विभागाचा अंदाज